अ‍ॅपशहर

मराठवाड्यात मृत्युदर घटला

मराठवाड्यात करोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी 'लॉकडाऊन'ची प्रभावी अंमलबजावणी, रुग्ण शोधण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे साडेपाच टक्क्यांवर गेलेला मृत्युदर आता ३.६० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 27 Jul 2020, 4:31 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus


मराठवाड्यात करोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी 'लॉकडाऊन'ची प्रभावी अंमलबजावणी, रुग्ण शोधण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे साडेपाच टक्क्यांवर गेलेला मृत्युदर आता ३.६० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. दरम्यान, रविवारी (२६ जुलै) मराठवाड्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १९ हजारांवर गेली.

मराठवाड्यात मे व जून महिन्यात साडेपाच टक्क्यांवर असलेला मृत्युदर जवळपास दोन टक्क्यांनी घसरला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा मृत्यूदर आता ३.३८, नांदेड ४.६१, परभणी ४.७४, लातूर ४.८३, जालना ३.१९, बीड ३.७५, हिंगोली १.८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ५.५७ टक्के मृत्यूदर आहे. २३ जून रोजी औरंगाबाद जिल्ह्याचा असलेला ५.३२ असलेला मृत्यूदर आता ३.३८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

आतापर्यंत मराठवाड्यामध्ये सर्वाधिक ११ हजार रुग्णसंख्या केवळ औरंगाबाद जिल्ह्यात असून, जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर 'रॅपिड अँटिजेन' आणि 'आरटीपीसीआर' चाचण्या सुरू आहेत. या माध्यमातूनही दररोज मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण सापडत आहेत. २६ जुलैपर्यंत मराठवाड्यात तब्बल १९ हजार ७१५ रुग्ण 'पॉझिटिव्ह' आहेत. यामधील १२ हजार ५५ रुग्ण आतापर्यंत यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दीड लाख नागरिकांना शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.

करोना बाधितांची संख्या पाहता केवळ शहरी भागामध्येच करेानाने थैमान घालणे सुरू असून, मराठवाड्याचा बराचसा ग्रामीण भाग अद्यापही करोना संसर्गापासून दूर आहे. औरंगाबादसारख्या शहरामध्ये याचा वेग सर्वाधिक आहे. शहरात रुग्णसंख्या २६ जुलै रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ हजार ९१२ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या तीन हजार ३०वर पोचली.

मराठवाड्यात करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संस्थात्मक विलगीकरणाचा पर्याय सक्तीने राबवण्यास सुरुवात करण्यात आली. २६ जुलैपर्यंत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये ७०९ रुग्ण करोनाचे बळी ठरले असून, यातील ४३७ रुग्ण एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. नांदेड जिल्ह्यात ५५, परभणी २३, लातूर ७३, जालना ५९, बीड २०, हिंगोली सहा, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

१२ हजारांवर रुग्णांनी 'करोना'ल हरवले

मराठवाड्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, बाधित असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत मराठवाड्यात १२ हजार ५५ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. मराठवाड्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ६१.१५ टक्के असून, सुखरूप घरी जाणाऱ्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील आठ हजार १५९, नांदेड ६४९, परभणी २३८, लातूर ७९७, जालना एक हजार १५५, बीड २८५, हिंगोली ३५८ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१४ अशा एकूण १२ हजार ५५ रुग्णांचां समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज