अ‍ॅपशहर

‘कॉपी-पेस्ट’ संशोधनाला आळा

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन अध्यादेशानुसार एमफिल अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल झाला आहे. या पीएचडी धर्तीवरील पद्धतीमुळे संशोधनाचा दर्जा सुधारणार असून प्रथमच मौखिक परीक्षा घेण्यात येणार आहे, मात्र प्राध्यापकांच्या श्रेणीनुसार संशोधकांच्या जागा मर्यादित करण्यात आल्या आहेत. या नवीन नियमामुळे यंदा एमफिल संशोधकांची संख्या निम्म्याने घटणार आहे.

Maharashtra Times 12 Jul 2017, 3:00 am
Tushar.Bodkhe@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new syllabus for m phil
‘कॉपी-पेस्ट’ संशोधनाला आळा

Tweet : @tusharbMT
औरंगाबाद ः विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन अध्यादेशानुसार एमफिल अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल झाला आहे. या पीएचडी धर्तीवरील पद्धतीमुळे संशोधनाचा दर्जा सुधारणार असून प्रथमच मौखिक परीक्षा घेण्यात येणार आहे, मात्र प्राध्यापकांच्या श्रेणीनुसार संशोधकांच्या जागा मर्यादित करण्यात आल्या आहेत. या नवीन नियमामुळे यंदा एमफिल संशोधकांची संख्या निम्म्याने घटणार आहे.

‘कॉपी-पेस्ट’ पद्धतीने वादग्रस्त ठरलेल्या एम. फिल अभ्यासक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्त्वाचे बदल केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा अध्यादेश तीन ऑक्टोबर २०१६ रोजी लागू केला आहे. नवीन अध्यादेशानुसार एमफिल गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देणारा अभ्यासक्रम ठरणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार एका विभागात कमाल २० संशोधक विद्यार्थ्यांना एमफिलसाठी प्रवेश देण्यात येत होता. आता प्राध्यापकांच्या श्रेणीनुसार संशोधक विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रोफेसर ०३, असोसिएट प्रोफेसर ०२ आणि असिस्टंट प्रोफेसर ०१ अशी विद्यार्थ्यांची मर्यादा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विभागातील प्राध्यापकांच्या संख्येनुसार विद्यार्थ्यांची संख्या अवलंबून आहे. मागील वर्षी विद्यापीठात एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३२० होती. यावर्षी संख्येत निम्मी घट होणार आहे. मात्र, सामाजिक आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

५० टक्के खुला प्रवर्ग आणि ५० टक्के राखीव प्रवर्ग असे जागांचे स्वरूप आहे. विद्यार्थी संख्या घटणार असली तरी कोणत्याही प्रवर्गाच्या जागा कमी होणार नाहीत. एका वर्षात दोन सत्र किंवा कमाल दोन वर्षे असा अभ्यासक्रम कालावधी आहे. पीएच. डी. संशोधनाच्या पद्धतीनुसार एमफिलचे काम होणार आहे. एकूण ३० श्रेयांक असून, मेथॉडॉलॉजीला ८ श्रेयांक आहेत. संख्यात्मक संशोधन, संगणक अॅप्लिकेशन, संशोधन साहित्य आढावा या घटकांना प्रत्येकी दोन श्रेयांक आहेत.

प्रशिक्षण-सर्वेक्षण व सेमिनारला प्रत्येकी एक श्रेयांक आहे. पहिल्या सत्रात कोर्सवर्क पूर्ण करावा लागणार आहे. बहिस्थ परीक्षकांच्या माध्यमातून परीक्षण केले जाणार आहे. एमफिल प्रवेश प्रक्रिया आठ जुलैपासून सुरू झाली असून, २९ जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) आहे. विद्यापीठातील १८ विभागात एमफिल अभ्यासक्रम आहे.

तोंडी परीक्षा होणार
यावर्षीपासून एमफिल अभ्यासक्रमात मौखिक परीक्षा होणार आहे. प्रबंध सादर करण्यापूर्वी पूर्व तोंडी परीक्षा होईल. या परीक्षेला उपस्थित संशोधक व परीक्षांच्या सूचना असल्यास संशोधनात बदल करावा लागणार आहे; तसेच संशोधन काळात एक शोधनिबंध मान्यताप्राप्त जर्नलमध्ये प्रकाशित होणे बंधनकारक आहे. अंतिम प्रबंध सादर करण्यापूर्वी कुलगुरू मान्यता देणार आहेत. संगणक आणि अत्याधुनिक संशोधन पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी संशोधन करणे अपेक्षित आहे. या प्रकारामुळे दर्जेदार शोधनिबंध तयार होतील असा तज्ज्ञांचे मत आहे.

नवीन पद्धतीमुळे एम. फिलचा दर्जा निश्चित सुधारणार आहे. संशोधनात प्रथमच संगणकाचा वापर वाढणार असून नवीन पद्धती आदर्श आहे. जगभरातील संशोधन इंटरनेटवर उपलब्ध असताना आपल्यालाही दर्जेदार संशोधनाची संधी मिळाली आहे.
- प्रा. डॉ. कैलास अंभुरे, मराठी विभाग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज