म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशू परीक्षणाची (न्यू बॉर्न स्क्रिनिंग टेस्ट) विशेष सुविधा उपलब्ध झाली असून, याविषयीच्या जनजागृतीचा संकल्प नुकत्याच झालेल्या कार्यशाळेतून करण्यात आला.
'एमजीएम'चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी नवजात शिशुची काळजी कशा प्रकारे घेतली जावी, यासह समाजात नवजात शिशू परीक्षणाविषयी जनजागृतीची गरज असल्याचे मत आवर्जून नमूद केले. या प्रसंगी 'एमजीएम'चे उपअधिष्ठाता व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी या संबंधीच्या जनजागृतीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेत डॉ. सुवर्णा मगर यांनी मार्गदर्शन केले. लहान मुलांच्या चयापचयाच्या संबंधीचे आजार भविष्यात उद्भवू शकतात. कोणत्याही प्रकारची लक्षणे न दिसताही हे आजार त्या मुलाच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे बाळाची एक छोटी रक्तचाचणी केल्यास भविष्यातील आजारांचे निदान होऊन त्यांना आटोक्यात आणता येऊ शकते, असे डॉ. मगर म्हणाल्या. वैद्यकीय संचालक डॉ. अजित श्रॉफ, 'एमजीएम ट्रस्ट'चे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेला स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाप्रमुख डॉ. लक्ष्मी रचकोंडा, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माधुरी एंगडे, प्रा. डॉ. अंजली काळे, बालरोग विभागाचे डॉ. सचिन धुळे, डॉ. शुभांगी मांडे, डॉ. गौरी बापट. डॉ. गौरी डंक, डॉ. सुनील गव्हाणे आदींची उपस्थिती होती.