\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\B'हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या निविदेत आमचा इंटरेस्ट सिद्ध करून दाखवावा. आयुक्तही प्रामाणिकपणे काम करीत आहेत. आरोप करून कामात खोडा घालू नका,' असे प्रत्युत्तर महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांना दिले आहे.
हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या निविदेवरून मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर तनवाणी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेवून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. या आरोपांना महापौरांनी पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. ते म्हणाले, 'तो कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आमचा इंटरेस्ट आहे. या प्रक्रिया प्रकल्पाचे काम करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरी एजन्सी असेल तर, त्यांनी प्रयत्न करायला हवे होते किंवा पुन्हा निविदा काढण्यासाठी प्रशासनाला भाग पाडायचे असते. कचरा प्रक्रिया केंद्रांबद्दल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर खंत व्यक्त केली. त्या बैठकीत महापालिकेचे वाभाडे निघाले. त्याच एजन्सीला काम द्या, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले नाही. प्रक्रिया केंद्राचे काम लवकर सुरू करा असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या निविदेबद्दल स्थायी समितीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. भविष्यातील कचऱ्याच्या समस्येचा विचार करून 'डीपीआर' तयार करण्यात आला आहे. त्या 'डीपीआर'नुसारच हर्सूल येथे कचरा प्रक्रिया केंद्रासाठी निविदा काढली आहे. ही निविदा रद्द केल्यावर आणि दोन - चार वर्षांनी या केंद्राचे काम केल्यावर त्याची किंमत वाढल्यास वाढीव किंमतीची जबाबदारी कोण घेणार,' असा सवाल महापौरांनी केला.
\Bभाजपला प्रश्न सोडवायचा नाही
\Bमहापौर म्हणाले, 'हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे काम एजन्सीशिवाय होत असेल तर, त्यात आम्हाला आनंद आहे. त्या प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण व्हावे ही आमची भावना आहे. तो प्रस्ताव सध्या स्थायी समितीच्या कस्टडीत आहे. त्यांनी लवकरात लवकर त्याबद्दल निर्णय घ्यावा. त्यांनी निर्णय घेतल्यावर पुढे नियोजन आमच्याकडे तयार आहे. भाजपला कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा नाही. शिवसेनेला हा प्रश्न सोडवायचा आहे.'