म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
नवीन पाणी पुरवठा योजनेचे सोमवारी (१ जुलै) सादरीकरण केले जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक स्वत: हे सादरीकरण करणार आहेत. या सादरीकरणासाठी पालिकेतील पदाधिकारी व गटनेते यांना निमंत्रण दिले जाणार आहे. पालिका प्रशासनाने नगरविकास खात्याकडे औंरगाबाद शहरासाठीच्या दोन पाणी पुरवठा योजनांचे डीपीआर सादर केले आहेत. एक योजना २४०० मिलीमीटर व्यासाची आणि १५०० कोटी रुपये खर्चाची आहे, तर दुसरी योजना २८०० मिलीमीटर व्यासाची आणि २००० कोटी रुपये खर्चाची आहे. प्रशासनाने नगरविकास खात्याला सादर केलेल्या योजनेची पुरेशी माहिती पदाधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे त्या योजनांचे सादरीकरण करा असे महापौरांनी आयुक्तांना कळवले होते, त्यानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजता सादरीकरण करण्याची तयारी आयुक्तांनी दर्शवली आहे.