अ‍ॅपशहर

‘जीवनदायी’ महाराष्ट्र दिनापासून ‘महात्मा फुले’

राज्यातील गोरगरीब-अल्प उत्पन्नधारकांना मागच्या पाच वर्षांत पूर्णपणे निःशुल्क उपचार उपलब्ध करून देणाऱ्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ महाराष्ट्र दिनापासून ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ होणार आहे. याबाबचा दीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारचे आदेश नुकतेच प्राप्त झाले.

निखिल निरखी | Maharashtra Times 29 Apr 2017, 9:27 am
औरंगाबादः राज्यातील गोरगरीब-अल्प उत्पन्नधारकांना मागच्या पाच वर्षांत पूर्णपणे निःशुल्क उपचार उपलब्ध करून देणाऱ्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ महाराष्ट्र दिनापासून ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ होणार आहे. याबाबचा दीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारचे आदेश नुकतेच प्राप्त झाले. नव्या योजनेमध्ये वाढीव उपचारांचा समावेश करण्यात येणार असून, उपचारांचे पॅकेज वाढवण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येईल व अंमलबजावणी एक जुलैपासून होईल, असे मानले जाते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajiv gandhi health scheme known as mahatma phule scheme from maharashtra day
‘जीवनदायी’ महाराष्ट्र दिनापासून ‘महात्मा फुले’


कॅन्सर, हृदयविकार आदी मोजक्याच उपचार-शस्त्रक्रियांसाठी असलेल्या पूर्वीच्या जीवनदायी योजनेत आमूलाग्र बदल करून ९७१ प्रकारच्या उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रियांचा समावेश ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’मध्ये करण्यात आला व त्याची अंमलबजावणी २०१२पासून राज्यात झाली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णाला नामांकित खासगी रुग्णालयात पूर्णपणे निःशुल्क उपचार उपलब्ध झाले. एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना, केशरी, पिवळे रेशन कार्डधारकांना ही योजना लागू करण्यात आली होती. दुष्काळाचा विचार करून मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनादेखील योजना सरसकट लागू करण्यात आली. सात-बारा दाखवा आणि उपचार घ्या, असे त्याचे स्वरूप आहे, मात्र उपचारांचे पॅकेज कमी असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे योजनेची व्याप्ती वाढवण्याची मागणी होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मागेच ‘राजीव गांधी योजने’चे नाव सुधारणांसह ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ करण्याचे जाहीर केले होते. १३ एप्रिल रोजी योजनेच्या नामांतराचा शासन आदेश काढण्यात आला; परंतु एक एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७पर्यंत योजनेतील विमा कंपन्यांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

विमा कवच दोन लाखांपर्यंत

‘राजीव गांधी’मध्ये संपूर्ण कुटुंबाला एका वर्षासाठी दीड लाखांपर्यंतचे विमा कवच होते. नव्या योजनेत कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे विमा कवच मिळणार आहे; तसेच नी-रिप्लेसमेंट, हिप-रिप्लेसमेंटचा समावेश नव्याने असेल व बहुतांश उपचारांचे पॅकेज वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सद्यस्थितीत योजनेमध्ये ‘किडनी ट्रान्स्प्लान्ट’चे पॅकेज अडीच लाखांचे असून, ते नव्या योजनेत तीन लाखांपर्यंत होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
लेखकाबद्दल
निखिल निरखी
निखिल निरखी हे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये गेल्या १० वर्षांपासून, तर पत्रकारितेत २३ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी दिव्य मराठी, सकाळ, लोकपत्र आदी दैनिकांमध्ये काम केले आहे. ते आरोग्य, बाजार, न्यायालय आदींविषयक वृत्तलेखन करतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज