अ‍ॅपशहर

राजकारणातील आलेख घसरल्याने राणेंचा तोल सुटला

'नारायण राणे यांचा राजकारणातील आलेख आता उतरू लागला आहे, त्यांची विश्वासार्हता राहीलेली नाही. त्यामुळे त्यांचा तोल सुटू लागला आहे,' अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.

Maharashtra Times 14 Feb 2018, 6:03 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम khaire


'नारायण राणे यांचा राजकारणातील आलेख आता उतरू लागला आहे, त्यांची विश्वासार्हता राहीलेली नाही. त्यामुळे त्यांचा तोल सुटू लागला आहे,' अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.

नारायण राणे यांची दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत सभा झाली होती, या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. खैरेंवर त्यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना खैरे 'मटा' शी बोलत होते. खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी नमस्कार करतो, कारण ते माझे दैवत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याही मी पाया पडतो कारण ते आमचे नेते आणि कुटुंब प्रमुख आहेत. पाया पडणे यामागे मान देण्याचा हेतू असतो. आदित्य ठाकरे मात्र हातात हात घेतात. नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनीच मोठे केले आहे. साध्या कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत त्यांना संधी दिली. ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांच्याबद्दल वाईट बोलणे योग्य नाही, हे राणे यांनी लक्षात ठेवले पाहिजे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींच्या पाया पडायचे, पण सोनिया गांधींनी त्यांना दूर सारले. शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवताना राणे दोन वेळा पडले, त्यामुळे त्यांची आता काहीत ताकद नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे, त्यामुळे तेही राणे यांना बाजूला करीत आहेत, असा टोमणा खासदारांनी लागावला.

राणेंची फक्त दादागिरी

राणे यांची फक्त दादागिरी आहे, असे स्पष्ट करताना खैरे म्हणाले, मी माझ्या मतदारसंघात सातत्याने काम करतो आणि त्यामुळेच निवडून येतो. औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा योजना मी आणली आणि राणे यांच्या समर्थकांनी त्याला विरोध केला, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज