अ‍ॅपशहर

‘विराट स्वतःला सिद्ध करतोय’

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली स्वतःला सिद्ध करतो आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगला खेळ करते आहे, असे मत श्रीलंकेचे माजी कसोटीपटू सनथ जयसूर्या यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 12 Nov 2016, 3:05 am
‘विराट स्वतःला सिद्ध करतोय’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanath jayasuriya press conference
‘विराट स्वतःला सिद्ध करतोय’

सनथ जयसूर्या यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली स्वतःला सिद्ध करतो आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगला खेळ करते आहे. मात्र, भारतीय संघातील फलंदाजांची नावे पाहता संघ विराटवर अवलंबून आहे, असे मत श्रीलंकेचे माजी कसोटीपटू सनथ जयसूर्या यांनी व्यक्त केले. भारतीय संघाने मायदेशात उत्तम कामगिरी केली असली, तरी ही कामगिरी परदेशात करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असल्याचेही जयसूर्या यांनी नमूद केले.
व्हेरॉक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना जयसूर्या बोलत होते. कसोटी, वन-डे, टी-२० अशा विविध प्रकारांमधील क्रिकेट स्पर्धांमुळे दीर्घ काळ क्रिकेट खेळणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर सततच्या क्रिकेटमुळे खेळाडूंच्या दुखापतींचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कारकीर्द करणारे खेळाडू आता कमी उरले आहेत, असे जयसूर्या म्हणाले. क्रिकेट जगतात आता टी-२० सारखे प्रकार प्रचलित झाले आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढल्याने खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. शरिराला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याने क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कारकीर्द घडवणारे खेळाडू आता कमी होत आहेत, असे त्यांनी सांगितले.
औरंगाबादेत सलग अकरा वर्षे एखादी स्पर्धा आयोजित करणे सोपे नसल्याचे सांगत सनथ जयसूर्या यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. श्रीलंका संघातील दिग्गज खेळाडूंची फळी निवृत्त झाल्याने सध्या श्रीलंका संघ कठीण परिस्थितीतून जातो आहे. संघाची कामगिरी सुधारण्यासाठी आणखी वर्षभराचा अवधी लागेल, असे ते म्हणाले. या वेळी व्हेरॉकचे सहाय्यक उपाध्यक्ष सतीश मांडे, एम. पी. शर्मा, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर, पारस छाजेड, राहुल टेकाळे आदी उपस्थित होते.
--
खेळाडूंच्या श्रीलंकावारीचा प्रस्ताव पाठवा
सांस्कृतिक अभ्यासदौऱ्यात देशातील युवा पिढीचे आदानप्रदान करण्यात येते. त्या पार्श्‍वभूमीवर उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे दोन राष्ट्रांदरम्यान आदानप्रदान करता येईल का असा सवाल व्हेरॉकचे उपाध्यक्ष एम. पी शर्मा यांनी जयसूर्या यांना केला. त्याला तातडीने होकार देत जयसूर्या यांनी शर्मा यांना तसा प्रस्ताव पाठवण्यास सांगितले. त्यानंतर यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन जयसूर्या यांनी दिले. स्थानिक क्रिकेट संघटनेने चांगल्या खेळाडूंची पारख करून त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज