अ‍ॅपशहर

Crime News : घरमालकाचा मुलगा दारू पिऊन आला, गरीब विद्यार्थ्यांना मारहाण, लाखो रुपये घेऊन फरार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : मोठे प्रयत्न करून ग्रामीण भागातील मुलं शिक्षणासाठी गाव आणि घर सोडून शहरात येतात. पण शहरात आल्यावरही त्यांच्या समस्या सुटत नाही. आता शिक्षणासाठी आलेल्या गरीब मुलांसोबत अशीच भयंकर घटना घडली आहे.

Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2023, 2:02 pm
छत्रपती संभाजीनगर : दारूच्या नशेत घरमालकाच्य मुलाने शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर पैशासाठी चाकू हल्ला केला. यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाले. इतर दोघांना मार लागला आहे. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. धक्कादायक घटना बुधवार रात्री टीव्ही सेंटर भागात उघडकीस आली. या प्रकरणी सिडको पोलीस कारवाई करत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ​chhatrapati sambhaji nagar crime news
शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर घरमालकाच्या मुलाचा चाकू हल्ला


या प्रकरणी जखमींच्या नातेवाईकांनी माहिती दिली. प्रमोद पंढरीनाथ गायकवाड, निवृत्ती कडूबा कावळे, रवी जगन्नाथ गायकवाड आणि अभिषेक गोकुलादास गायकवाड हे फुलंब्री तालुक्यातील वाघोळा या गावचे चार विद्यार्थी आहेत. दहावी बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील खासगी शिकवणीचे क्लास करण्यासाठी शहरामध्ये आले. या चारही मुलांचे आई-वडील मोलमोजुरी करण्याचं काम करून उदरनिर्वाह भागवतात.

दोघांनी सोबत दारू ढोसली, मटणाच्या पीसवरुन राडा, मित्रानेच मित्राला संपवलं
पीडित विद्यार्थी टीव्ही सेंटर भागामध्ये रूम करून राहतात. काही दिवसांमध्ये शिकवणीचे पैसे भरण्यासाठी आई-वडिलांनी त्यांना पैसे आणून दिले होते. यामुळे प्रत्येकाजवळ ४० ते ५० हजार रुपये होते. चार विद्यार्थ्यांचे मिळून एकूण दोन लाख रुपये रक्कम रूममध्ये ठेवली होती. या पैशाची माहिती घरमालकाच्या मुलाला मिळाली. यानंतर घरमालकाचा मुलगा दारू पिऊन आला आणि मुलांना मारहाण करत पैशांची मागणी केली. एवढ्यावर न थांबता त्याने विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. यानंतर घरमालकाचा मुलगा विद्यार्थ्यांजवळीचे पैसे घेऊन पसार झाला. या हल्ल्यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याच्यासह इतर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.


या घटनेमुळे संपूर्ण शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर पैशासाठी चाकू हल्ला केल्याने सर्व स्तरातून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दल
सचिन फुलपगारे
सचिन फुलपगारे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत, मीडियामध्ये काम करण्याचा १९ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न आणि मुद्द्यांवर काम करण्यात आवड आहे. सतत नवीन शिकण्याची तयारी.... आणखी वाचा

महत्वाचे लेख