अ‍ॅपशहर

‘शुगरकेन लिफ्ट’ ठरतेय वरदान

उस्मानाबाद तालुक्यातील लासोना येथील गुरुलिंग स्वामी यांनी ऊसतोड कामगारांना ऊस ट्रकमध्ये चढविण्यासाठीची सुटसुटीत अशी लिफ्ट तयार केली आहे.

Maharashtra Times 10 Nov 2017, 3:16 am
‘शुगरकेन लिफ्ट’ ठरतेय वरदान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sugercane lift made by swami
‘शुगरकेन लिफ्ट’ ठरतेय वरदान

गुरुलिंग स्वामी यांची अनुभवातून यंत्रनिर्मिती

मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद

ऊसतोड झाल्यानंतर ऊस ट्रकमध्ये चढविताना ऊसतोड कामगारांची होणारी परवड लक्षात घेऊन उस्मानाबाद तालुक्यातील लासोना येथील गुरुलिंग स्वामी यांनी ऊसतोड कामगारांना ऊस ट्रकमध्ये चढविण्यासाठीची सुटसुटीत अशी लिफ्ट तयार केली आहे. तांत्रिक शिक्षण न घेतलेल्या स्वामी यांनी कृषीक्षेत्रात लागणाऱ्या विविध अवजार निर्मितीच्या अनुभवातून हे यंत्र विकसित केले. स्वामींची ही शुगरकेन लिफ्ट आता ऊसतोड कामगारांसाठी वरदान ठरते आहे.
यापूर्वी, ऊसतोड झाल्यानंतर सुमारे २७ टन ऊस ट्रकमध्ये चढविण्यासाठी किमान सात तासांचा अवधी लागायचा. मात्र आता हेच काम या शुगरकेन लिफ्टने अवघ्या दोन तासांत होऊ लागले आहे. यामुळे ट्रक चालकांच्या वेळेची बचत तर झालीच, परंतु ऊसतोड कामगारांचे कामदेखील सोपे झाले आहे. मजुरांची मेहनत, पैसा व वेळेत बचत करणारी अशी ही शुगरकेन लिफ्ट प्रगतशील शेतकरी व उद्योजक अशी ख्याती असलेल्या गुरुलिंग स्वामी यांनी बनविली आहे. जेमतेम शिक्षण झालेल्या स्वामी यांनी कल्पकतेच्या जोरावर आणि प्राप्त तांत्रिक ज्ञानाच्या आधारावर हे यंत्र तयार केले असून, या यंत्रास सध्या ऊसतोड टोळ्यांकडून, तसेच साखर कारखानदारांकडून चांगली मागणी आहे. चार अश्वशक्तींची मोटर (इंजिन), गिअर बॉक्स व मोठया आकाराची चेन याचा वापर करून त्यांनी ही शुगरकेन लिफ्ट तयार केली. याची उंची १२ ते १५ फुटांपर्यंत कमी अधिक करता येते. याद्वारे ६ मोळ्या एका वेळेस ट्रकमध्ये सहजरित्या जाऊ शकतात.
आतापर्यंत ऊस ट्रकमध्ये भरण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागत होता. उसाची मोळी महिला व पुरुष कामगार डोक्यावर घेऊन बैलगाडीतून ट्रकमध्ये चढवीत होते. हे डोईजड काम करताना त्यांची मोठी दमछाक होत होती. लासोना येथील स्वामी बंधूनी यापूर्वी कोल्हापूर बंधाऱ्यापेक्षा टिकाऊ असे स्वामी बंधारे तयार करून नावलौकिक मिळविला होता. टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी शेतकामांसाठी उपयुक्त अशा लहानशा ट्रॅक्टरची निर्मितीही केली होती. कडबाकुट्टी, ट्रॅक्टरची अवजारे, पेरणीयंत्र याशिवाय शेतीकामांसाठी लागणारे सर्व साहित्य ते बनवितात. कृषी यांत्रिकीकरणावर आधारित यंत्र व अवजारे निर्मितीबद्दल तसेच बंधाऱ्याच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही स्वामी बंधूंचे कौतुक केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज