अ‍ॅपशहर

उद्योजक व्हा... : सृजनाचा असाही लखलखाट

इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापकी करावी, असा घरातून आग्रह होता, पण रोहित नाईकवाड यांनी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. केवळ तीन वर्षांत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशपर्यंत इंडस्ट्रीय-स्ट्रीट लाईट पोचवले.

Maharashtra Times 29 Jun 2016, 3:00 am
Nikhil.Nirkhee@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम udyojak vhya rohit nayakiwad
उद्योजक व्हा... : सृजनाचा असाही लखलखाट

नाईकवाड हे मूळचे वर्ध्याचे. रोहित यांचे वडील सुनील नाईकवाड हे जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. रोहित यांना पहिल्यापासूनच यंत्र-तंत्राची मूलभूत आवड असल्यामुळेच त्यांनी अभियांत्रिकीच्या यांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. पहिल्याच वर्षी आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ या उपक्रमात सहभाग घेतला. चार ब्लॉक उचलून ठेवण्यासाठी लागणारे उपकरण तयार करण्याची थीम होती आणि रोहित यांच्यासह त्यांच्या चार मित्रांनी अडीच महिने खर्ची घालून खास उपकरण तयार केले. प्रत्यक्ष ‘टेकफेस्ट’मध्ये देशातील कानाकोपऱ्यातून ३२४ विद्यार्थ्यांनी उपकरणे सादर केली होती आणि जवळजवळ प्रत्येक उपकरण हे खास असेच होते. हे सगळे बघून रोहित व त्यांच्या मित्रांना आपले उपकरण फालतू वाटू लागले. आपण कुठून व कशाला आलो, अशी काहीशी भावना झाली आणि चौघे पार निराश झाले. त्याचवेळी माइकवरून त्यांचे उपकरण सर्वांपेक्षा कसे वेगळे आहे, हे सांगण्यात येऊ लागले आणि चौघांची ‘कॉलर टाइट’ झाली. बहुतेकांनी ‘रोबोटिक आर्म’ तयार केला होता, तर चौघांनी अनोखी लिफ्ट व त्यामध्ये अजून एक वेगळे उपकरण तयार करून आपली तांत्रिक सर्जनशीलता सिद्ध केली होती आणि पहिल्या ३२ स्पर्धकांमधून त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता. हे यश रोहित यांना मोठा आत्मविश्वास देऊन गेले. त्यानंतर रोहित व त्यांच्या मित्रांनी कॉलेजमध्ये ‘टेक्निकल लॅब’ सुरू करण्याची मागणी लावून धरली आणि या मागणीला कॉलेमधील प्रोफेसर यु. डी. गुल्हानी यांनीही मोठा पाठींबा दिला. शेवटी लॅब मान्य होऊन एकदाची सुरू झाली व विद्यार्थ्यांसाठी २४ तास खुली ठेवण्यात आली. या सगळ्या प्रक्रियेत रोहित यांचे तंत्रकौशल्य, नवीन करण्याचा ध्यास व नेतृत्वगुण प्रोफेसर गुल्हाने यांनी हेरले आणि तिथून सुरू झाले गुरू-शिष्याचे नाते. निष्णात प्रोफेसर असलेले गुल्हाने हे उद्योजक होते व ते ‘ट्रान्सफॉर्मर’सह ‘नॅनो’साठी काही सुट्या भागांची निर्मिती करत होते. हे सर्व ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याची, शिकून समृद्ध होण्याची एकही संधी रोहित यांनी सोडली नाही. रोहित यांच्यामधील चुणूक पाहून प्रोफेसर गुल्हाने हेदेखील मुक्तहस्ते ज्ञान देत गेले व रोहित सर्वांगाने समृद्ध होत गेले. त्याचदरम्यान पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षी व ऐन विशीत नोकरी करण्यापेक्षा उद्योग-व्यवसाय करण्याचे रोहित यांचे निश्चित झाले.

कटू अनुभवातूनही शिक्षण
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोहित यांनी एमई करावे, प्राध्यापक व्हावे व दहा ते पाचची नोकरी करावी, अशी वडिलांची इच्छा होती, मात्र रोहित यांना प्राध्यापकीत रस नव्हता. त्याचवेळी रोहित यांची चुणूक बघून त्यांनी ‘एमई’ऐवजी ‘इंडो-जर्मन टूल रूम’मध्ये ‘टूल डिझायनिंग अँड कॅड-कॅम’चा दीड वर्षांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा, असा सल्ला त्यांच्या गुरुने दिला; तसेच एका वरिष्ठ उद्योजकासोबत काम करण्याची, अनुभव घेण्याची आयती संधीही मिळवून दिली. अभ्यास-प्रात्यक्षिक एकाचवेळी सुरू होते व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याच वरिष्ठ उद्योजकासोबत भागीदारी करावी, अशी संधीही सहजच चालू आली. रोहित यांनी उद्योग-व्यापार करावा, अशी वडिलांची इच्छा नव्हती, मात्र उद्योग-व्यापार करण्यासाठी रोहित पूर्णपणे झपाटलेले होते व त्यांच्या इच्छेमुळेच वडिलांनी सात लाखांचे कर्ज घेऊन रोहित यांना भांडवल मिळवून दिले आणि त्याच वरिष्ठ उद्योजकासोबत ‘ऑटो कंपोनंटस’निर्मितीच्या उद्योगात रोहित यांची भागीदारी सुरू झाली. दीड वर्ष चांगले चालले, परंतु ज्ञान-माहिती-अनुभवाच्या जोरावर भरारी घेण्याची वृत्ती रोहित यांना स्वस्थ बसू देईना व त्यांचा वरिष्ठ सहकारी त्यांच्यासोबत भरारी घेण्यास तयार होईना. त्यामुळे मतभेद वाढत गेले व शेवटी भागीदारीतून बाहेर पडण्याचा कटू निर्णय रोहित यांनी घेतला. त्याचा वडिलांसह रोहित यांना मनस्ताप झाला. ‘या तीन वर्षांत एमई होऊन तू प्राध्यापक झाला असता, ते पैसे व तीन वर्षे वाया गेले,’ असे खडे बोल वडिलांनी सुनावले. तरीसुद्धा काहीतरी नवीन करण्याची जिद्द रोहित यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्याच विचारांचा स्वप्निल बडे हा आणखी एक पार्टनर त्यांना भेटला आणि ‘एलईडी दिव्यां’ची निर्मिती करण्याचे ध्येय उराशी घेऊन उद्योग जगतात पाऊल टाकण्याचे निश्चित केले.

देशभर जोरदार घौडदौड
पुन्हा एकदा उद्योग उभारण्याच्या रोहित यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला मित्रांनी मनस्वी साथ दिली. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मित्राने चार लाखांचे कर्ज घेऊन रोहित यांना पैसे दिले, तर आणखी काही मित्रांनी अडीच लाख मिळवून दिले. तेवढेच पैसे भागीदाराने टाकून शेंद्रा एमआयडीसीत भाड्याची जागा घेऊन ‘रेयॉन इल्युमिनेशन्स’ कंपनी स्थापून मार्च २०१४पासून एलईडी दिव्यांची निर्मिती सुरू केली. पूर्वीच्या अनुभवामुळे व सकारात्मक वृत्ती-प्रवृत्तीमुळे ‘डिलर नेटवर्क’ शाबूत होते व आणखी एका परिचिताच्या ओळखीतून पहिली ऑडर नाशिकमधून मिळाली. पहिल्याच महिन्यात लाखाची ऑर्डर मिळाली आणि नंतर औरंगाबाद-जालना-पुणे-मुंबईसह इतर ठिकाणच्या ऑर्डर मिळत गेल्या. अर्थात, चार-चारदा डेमो देऊन, दिव्यांचा प्रकाश किती प्रमाणात जास्त आहे व उर्जाबचत कशी जास्त होते, हे उपकरणांनी मोजून (लक्स लेव्हल) दाखवावे लागत होते. ते पटल्यामुळे आणि गुणवत्तेमुळेच हळुहळु संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधून इंडस्ट्रीअल एलईडी दिव्यांची मागणी सुरू झाली. सद्यस्थितीत टाटा ऑटोकॉम, व्हिडिओकॉन, संजीव ऑटो, एनआरबी, मॅन डिझेल यासारख्या अनेक कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. पुढे रोहित यांनी सौर उर्जेवरील दिव्यांची निर्मितीही सुरू केली आहे आणि आज त्याचाही अनेक राज्यांमध्ये पुरवठा होत आहे. आज तब्बल ३५ प्रकारच्या दिव्यांची निर्मिती ‘रेयॉन’मध्ये होत आहे. त्याचवेळी अनेक जुन्या-नव्या मित्रांना, आर्थिक स्थिती वाईट असलेल्या गरजू तरुणांना त्यांनी त्यांच्या उद्योगामध्ये सामावून घेतले आहे आणि ते आज उत्तम स्थितीमध्ये व्यवसाय करीत असल्याचा मनस्वी आनंद रोहित यांना आहे. उद्योग जगताच्या तिसऱ्या वर्षी व वयाच्या २७ व्या वर्षी रोहित यांनी त्यांच्या उद्योगाची उलाढाल साडेसहा कोटींवर नेली आहे व ही चौफेर घौडदौड मोठ्या वेगाने सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज