अ‍ॅपशहर

३ वर्षांनंतर बांगलादेशी महिला पोहचली स्वदेशी; महिला व बालविकासची कौतुकास्पद कामगिरी

एका वर्षाने महिला राजगृहाचा पदभार अपर्णा सूर्यवंशी यांच्याकडे आला. सूर्यवंशी यांनी या महिलेचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी बांगलादेशातील स्वयंसेवी संस्थांची मदत केली. त्यानंतर न्यायालयाची परवानगी, कृती दलाला प्रस्ताव पाठवणे आदी प्रक्रियेसोबतच महिलेच्या बांगलादेशातल्या पत्त्याची गृहचौकशी करण्यात आली.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 15 Nov 2022, 2:40 pm
औरंगाबाद : चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशमधून भारतात आणलेल्या महिलेला तीन वर्षांनंतर बांगलादेशच्या सीमेपर्यंत सुखरूप पोचवण्यात आले. महिला बालविकास विभागाच्या प्रयत्नातून ही कामगिरी यशस्वी झाली असून, भारत आणि बांगलादेशमध्ये २००९ मध्ये झालेल्या संयुक्त कृती योजनेनुसार ही प्रक्रिया पार पडली. दोन मुलांची आई असलेल्या ही पीडिता बांगलादेशच्या सीमेवर पोचली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india n bangladesh border
३ वर्षांनंतर बांगलादेशी महिला पोहचली स्वदेशी; महिला व बालविकासची कौतुकास्पद कामगिरी


महिला राजगृहात २०१९ पासून राहत होती महिला...

महिला राजगृहात २०१९ पासून राहत असलेली ही महिला बांगलादेशची होती. तिला दोन मुले असून तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले होते. भाऊ-बहिणीसोबत राहताना ती शिवणकाम करून घरखर्चाला मदत करायची. या दरम्यान तिला तिच्याच ओळखीच्या महिलेने भारतात अधिक चांगली मिळकत होईल, म्हणून भारतात जाण्यास सुचवले. त्यामुळे ती एका ओळखीच्या व्यक्तीसह २०१९मध्ये कोलकाता येथे आली. त्यानंतर ती मुंबईमधून औरंगाबादेत आली. या दरम्यान तिच्या कुटुंबाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे कदाचित ती कोव्हिडच्या लाटेत मरण पावली असावी, असे समजून कुटुंबाने तिचा शोध घेणे थांबवले. त्यानंतर औरंगाबादमध्ये धाडसत्रात ती सापडली. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत २०१९ पासून तिला बालविकास विभागाच्या महिला राजगृहात ठेवण्यात आले. त्यानंतर एका वर्षाने महिला राजगृहाचा पदभार अपर्णा सूर्यवंशी यांच्याकडे आला. सूर्यवंशी यांनी या महिलेचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी बांगलादेशातील स्वयंसेवी संस्थांची मदत केली. त्यानंतर न्यायालयाची परवानगी, कृती दलाला प्रस्ताव पाठवणे आदी प्रक्रियेसोबतच महिलेच्या बांगलादेशातल्या पत्त्याची गृहचौकशी करण्यात आली. महिलेकडे पासपोर्ट नसल्याने तिला नव्याने पासपोर्ट देण्यात आला. त्यानंतर पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पोलिस एस्कॉर्टसह तिला १७ ऑक्टोबरला हरिदासपूर सीमेपर्यंत नेण्यात आले. पुढे मानवी तस्करी विरोधी स्वयंसेवी संस्था जस्टिस अँड केअरमार्फत तिला तिच्या घरी पोचवले जाईल. ती घरी सुखरूपपणे पोचली आणि पुढे ती सुरक्षित आहे याची माहिती महिला बालविकास विभाग घेतली जाईल.

याबाबत अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी म्हणाल्या, ‘तू आता पुन्हा घरी जाणार असल्याचे संबंधित महिलेला सांगितल्यावर तिला आनंद झाला.’ या प्रक्रियेसाठी टास्क फोर्सचे सदस्य महिला बालविकास आयुक्तलयातील विभागीय उपायुक्त दिलीप हिवराळे यांच्यासह विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख, प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रमोद इंदोले, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, विदेशी नागरिक नोंदणी शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सुजाता राजपूत, पोलीस अंमलदार प्रशांत बुरांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

महत्वाचे लेख