अ‍ॅपशहर

पैशांसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचं अपहरण; मात्र आरोपींनी एक चूक केली अन् पोलिसांच्या हाती लागले!

Beed News : संबंधित आरोपी आणि पीडित मुलगी ही इंदापूर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी या परिसरात सापळा रचला आणि आरोपींना अटक केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2023, 8:32 pm
बीड : आष्टी शहरातील एका मोठ्या ठेकेदाराकडून खंडणी वसूल करण्यासाठी खंडणीबहाद्दरांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. आष्टी पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि गोपनीय पद्धतीने या अपहरण प्रकरणाचा तपास करून इंदापूर-भिगवण परिसरातून पीडित मुलीची सुटका केली आहे. तसंच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून आष्टी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ashti police
आष्टी पोलीस


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी शहरातील एका ठेकेदाराकडून खंडणी मिळावी म्हणून २५ मार्च रोजी रात्री अज्ञात इसमाने त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून ठेकेदाराने या प्रकरणाची माहिती आष्टी पोलिसांना दिली. त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे यांच्याकडे या गंभीर प्रकरणाचा तपास देण्यात आला. या तपासासाठी पोलिसांनी एक पथक नियुक्त केले.

मोठी बातमी: मुंबईतील दर्शन सोळंकी मृत्यू प्रकरणाला कलाटणी; पोलिसांना खोलीत सापडली चिठ्ठी

याच दरम्यान आरोपींकडून संबंधित ठेकेदाराला वारंवार तीन लाख रुपये मागणीचे फोन येत होते. दुसरीकडे आष्टी पोलीस आणि सायबर विभाग या फोनवर लक्ष ठेवून होता. तांत्रिक तपासाला आष्टी पोलिसांनी वेग देत संबंधित आरोपी आणि पीडित मुलगी ही इंदापूर-भिगवण परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी या भागात सापळा रचला. तेव्हा खंडणीबहाद्दरांनी पीडित मुलीस डांबून ठेवल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तेव्हा पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने आणि सावधपणे डांबून ठेवलेल्या ठिकाणावरून पीडित मुलीची सुटका करत तिला स्वत:च्या ताब्यात घेतले. तसंच अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली.

अवघ्या ३६ तासात आष्टी पोलिसांनी ही मोहीम फत्ते केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ही कारवाई पो. अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पो. अधीक्षक सचीन पांडकर, विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पो.नि. हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप. नि. अजित चाटे, पो.ना. प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव, महिला पोलीस स्वाती मुंडे, अंमलदार शिवप्रसाद तवले, सचीन कोळेकर यांनी केली.

महत्वाचे लेख