अ‍ॅपशहर

बीडमधील 'या' गावात काढतात जावयाची गाढवावरुन 'धिंड'; आठ दशकांची धुळवडीची परंपरा

जावयाची गाढवावरून धिंड काढत, धुळवडीची परंपरा बीड जिल्ह्यातील विडा या गावामध्ये यंदाही जपण्यात येणार आहे. गेल्या आठ दशकांपासून ही परंपरा पाळण्यात येत असून, गावाच्या परंपरेतील हा वेगळेपणा मानण्यात येतो.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 18 Mar 2022, 1:11 pm
आठ दशकांची धुळवडीची परंपरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम beed-holi


म. टा. प्रतिनिधी, बीडः जावयाची गाढवावरून धिंड काढत, धुळवडीची परंपरा बीड जिल्ह्यातील विडा या गावामध्ये यंदाही जपण्यात येणार आहे. गेल्या आठ दशकांपासून ही परंपरा पाळण्यात येत असून, गावाच्या परंपरेतील हा वेगळेपणा मानण्यात येतो.

केज तालुक्यातील विडा हे सर्वसामान्य गावसारखे गाव. बारा वाड्या आणि तेरावे विडा अशी विडा गावाची ओळख. होळी आणि रंगपंचमीचा सण या गावामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची ८५ वर्षांची परंपरा या गावाने जपलेली आहे. धुळवडीच्याआधी आठ दिवस या परंपरेसाठी जावयाचा शोध सुरू होतो. या गावातील जावई धुळवडीच्या आधी सासरवाडीकडे फिरकणे टाळतात. आता गावातच अनेक जावई असल्याने ग्रामस्थांचे काम थोडे सोपे झाले आहे. गावातील तरुण मंडळी धुळवडीच्या आधीपासून जावयाचा शोध घेतात आणि यातील एका जावयाचे मन वळवतात. त्यानंतर जावयासाठी चांगल्या गाढवाचा शोध घेण्यात येतो आणि त्या गाढवावरून जावयाची धिंड काढण्यात येते. ज्या गावात लग्नादिवशी घोड्यावरून मिरवत नेले जाते त्याच सासुरवाडीत गाढवावरून धिंड काढली जाते. सकाळी नऊच्या सुमारास जावयाला गाढवावर बसवले जाते, त्याच्या गळ्यात खेटरांचा हार घालण्यात येतो. या वरातीपुढे संपूर्ण गाव नाचत असतो. गावातील सर्व गल्लीबोळातून जाते. घराच्या छतावरून पाणी आणि रंग टाकला जातो. दुपारी मारुतीच्या पारावर जावयाला मानपानाचे कपडे आणि पूर्ण आहेर देऊन त्याचा सत्कार करण्यात येतो. धिंडीत कोणी काही जास्त त्रास दिला असेल, तर माफी मागितली जाते. जावईही मोठ्या मनाने धिंडीतली थट्टा आणि त्यानंतरचा सत्कार मोठ्या मनाने स्वीकारतो. विड्याच्या या परंपरेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबदल जावई गावाचे धन्यवाद मानतो.

८५ वर्षांची परंपरा

विडा येथे ८५ वर्षांपूर्वी गावचे जहागीरदार आनंदराव ठाकूर देशमुख यांचे जामाद म्हणजे जावई धुळवडीच्या दिवशी सासुरवाडीला आले होते . त्या दिवशी जावयाची थट्टा मस्करी करण्याचा विचार देशमुख यांच्या मनात आला आणि जावयाची थट्टा करण्यासाठी आनंदराव ठाकूर देशमुख यांनी जावयाची गाढवावरून धिंड काढली. त्यांना रंग लावला आणि हे सर्व झाल्यानंतर जावयाचा मानपान केला. ही प्रथा गावकर्यानि आजही जपली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज