अ‍ॅपशहर

घरातून निघाला ते परतलाच नाही, ४० दिवसांनी धड तर ६० दिवसांनी बाईक आढळली; तरुणाच्या मृत्यूचं गूढ सुटेना

Bhandara Crime News: भंडाऱ्यातील पवनी येथे एका तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा गूढ महिन्याभरानंतरही सुटत नाही. योगेशच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली मात्र पोलीस अद्यापही आरोपींना ताब्यात घेऊ शकलेले नाहीत. नेमकं काय घडलेलं?

| Edited byकरिश्मा भुर्के | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2023, 4:56 pm
पवनी : स्थानिक पदमा वार्डातील रहिवाशी बांधकाम ठेकेदार मृतक योगेश लोखंडेच्या मृत्यूचं गूढ तब्बल दीड महिन्यानंतरही कायम आहे. पोलिसांनी योगेशच्या वडिलांच्या तक्रारीनंतर त्याच्या पत्नीसह एका व्यक्तीविरुध्द तक्रार दाखल केली होती. मात्र अद्याप योगेशच्या मृत्यू प्रकरणी पुरावे हाती लागू शकले नाहीत. योगेशने आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं असलं तरी या घटनेदरम्यान घडलेल्या घडामोडी या संशयास्पद आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bhandara crime news


योगेश घरुन निघाला होता, त्यानंतर ४० दिवसांनी त्याचा मृतदेह इटगाव शेत शिवारात आढळला. मृतदेह आढळल्यानंतर परिसरात पोलिसांनी मोटारसायकल शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र मोटारसायकल कुठेही आढळली नाही. परंतु २० दिवसांनी त्याची मोटारसायकल त्याच परिसरात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आढळली. या सर्व बाबी संशयास्पद असल्याने योगेशचे वडील सिताराम लोखंडे आणि भाऊ जगदिश आणि अरविंद यांनी मृत योगेश लोखंडेची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आला असल्याची तक्रार नोंदवली.

नाईट शिफ्ट करुन सकाळी घरी आली, संध्याकाळी २२ वर्षीय नर्सचं भयंकर कृत्य; रत्नागिरीत हळहळ
योगेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, की योगेश २७ फेब्रुवारीला घरातून निघाला होता. त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत असल्याची माहिती योगेशची पत्नी चित्रा लोखंडेने दिर जगदिश यांना दिली होती. एका तासांपूर्वी योगेशचा भाऊ जगदीश त्याला भेटून कामावर गेला होता. पण त्यानंतर एका तासात असं काय घडलं की तो घरातून निघाला ते परत परतलाच नाही.

कोवळ्या वयातील प्रेमाचा भयंकर शेवट, नदीकाठी अशा परिस्थितीत आढळले की ओखळणंही कठीण, मग...
योगेश घरातून निघाल्यानंतर ४० दिवसांनी पवनीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर इटगाव शेत शिवारात रस्त्याच्या डाव्या बाजूला एका पाटात त्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाची स्थिती पाहून योगेशचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपेक्षा अधिक दिवसांपूर्वी झालेला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्याआधी योगेशला डांबून ठेवण्यात आलं होतं का? असा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला.


योगेशचा मृतदेह आढळल्यानंतर मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचा तपास केला. पण त्याची मोटारसायकल कुठेही आढळली नाही. मृतदेह मिळाल्यानंतर २० दिवसांनी घटनास्थळापासून अवघ्या ७०० मीटर अंतरावर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला मोटारसायकल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेह आढळला त्यावेळी कुठेही बाईक नव्हती. नंतर २० दिवसांनी त्या जागेवर मोटारसायकल कोणी आणून ठेवली याचा तपास पोलिसांनी घ्यावा अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली होती.


तक्रार देताच पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि योगेशच्या पत्नी आणि एका तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. परंतु पोलीस त्या दोघांना अद्यापही अटक करू शकलेवे नाही. त्यामुळे आता योगेशच्या मृत्यूचं गूढ कधी उलघडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाचे लेख