अ‍ॅपशहर

अहिरांच्या पुतण्याचा मित्रासह संशयास्पद मृत्यू, मृतदेहांशेजारी ग्लास-बाटली; गूढ अधिक गडद

Hansraj Ahir's Nephew Death Case: हंसराज अहिर यांचा पुतणा महेश आणि त्याचा मित्र हरिश यांनी उज्जैनला जात असल्याचे आपापल्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यानंतर १५ मार्चला दोघांचेही मोबाईल अचानक बंद झाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Mar 2023, 5:43 pm
चंद्रपूर : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पुतणा महेश अहिर आणि त्याचा मित्र हरिश धोटे यांचे मृतदेह चंदिगढ नजीकच्या जंगलात फासावर लटकवलेल्या अवस्थेत आढळले होते. ही आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र दोघांच्या मृतदेहाजवळ दारुची बाटली आणि काही ग्लास आढळून आले आहेत. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hansraj Ahir Nephew Death
हंसराज अहिर यांच्या पुतण्यासह मित्राचा मृतदेह आढळला


उज्जैनला जात असल्याचे महेश अहिर आणि हरिश धोटे यांनी आपापल्या कुटुंबियांना सांगितले होते. दरम्यान १५ मार्चला या दोघांचेही भ्रमणध्वनी अचानक बंद झाले. त्यामुळे कुटुंबियांनी शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध सुरु असतानाच बुधवारी चंदिगढ येथील कजेहडी गावाजवळील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले.

चंदिगढ पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यांच्या आधार कार्डवरुन त्यांची ओळख पटली. बुधवारी ते देहराडूनवरुन बसने आले आणि थेट जंगलात गेले. तत्पूर्वी परिसरातील एखाद्या हॉटेलमध्ये ते थांबले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सकृतदर्शनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या सुपूर्द करण्यात आले आहेत. गुरुवारी चंद्रपुरातील शांतीधाम येथे दोघांवरही अंत्यसंस्कार झाले.

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं
स्थानिक पोलिस सुद्धा ही आत्महत्याच आहे, असा दावा करीत आहे. परंतु घटनास्थळी आढळलेल्या एका वस्तूने आत्महत्येच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दोन्ही मृतदेहांजवळ दारुची बाटली आणि काही ग्लास आढळले आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी मद्यप्राशन केले असावे, असा कयास आहे. मात्र तिथे मिळालेल्या ग्लासची संख्या बघता आणखी काही जण त्यांच्या सोबत असावेत, असा संशय आहे.


चंदिगढ येथील स्थानिक माध्यमात सुद्धा यासंदर्भात वृत्तांकन आहे. या दोघांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत. त्यामुळे ही आत्महत्याच आहे, असे पोलिस म्हणत आहेत. परंतु अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप पोलिसांना मिळाली नाहीक. अनेक शक्यता पोलिस तपासून बघत आहेत. मुळात आत्महत्या करण्यासाठी दीड हजार किलोमीटरचे अंतर कापून हे दोघे का गेले, हेच मोठे गूढ आहे.

महत्वाचे लेख