अ‍ॅपशहर

आता खर्चायची चिंता

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयानंतर शनिवारी चौथ्या दिवशीही बँकांमध्ये या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यात भरण्यासाठी सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शंभर, पन्नासच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आता खर्चात हात आखडता घेतल्याने बाजारपेठेतील व्यवहार थंडावले आहेत.

Maharashtra Times 13 Nov 2016, 4:00 am
टीम मटा, जळगाव/धुळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम currency shortage in jalgoan
आता खर्चायची चिंता


पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयानंतर शनिवारी चौथ्या दिवशीही बँकांमध्ये या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यात भरण्यासाठी सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शंभर, पन्नासच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आता खर्चात हात आखडता घेतल्याने बाजारपेठेतील व्यवहार थंडावले आहेत.

राष्ट्रीयीकृत बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुटी असते, मात्र आजच्या शनिवारी या बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. नागरिकांनी सकाळी साडेसात-आठ वाजेपासूनच बँकांसमोर रांगा लावलेल्या होत्या. नियमांची पूर्ण माहिती नसणे, तसेच काही बँकांची मनमानी यामुळेही बँक अधिकारी व रांगेतील नागरिक यांच्यात वाद झाले. काही बँकांमध्ये रांग संपत नसल्याने दुपारी तीन वाजेनंतर एक्स्चेंज फॉर्म देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे नागरीक व बँक अधिकारी यांच्यात तू तू मैं मैं झाली.

एक्स्चेंज आठवड्यातून एकदाच

बँकांमधील दर्शनी भागात लावलेल्या सुचनेनुसार, एकावेळेस चार हजार रुपये एक्स्चेंज केल्यानंतर त्या पुढील आठवड्यात नोटा एक्स्चेंज करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे, तरीही अनेकांनी या सूचनेकडे काणाडोळा करत एक्स्चेंजसाठी रांगेत नंबर लावलेला होता.

युनियन बँकेत पोलिस बंदोबस्त

नवी पेठेतील युनियन बँकेच्या शाखेत नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची वेळ आली. या बँकेत एक्स्चेंज व विड्रॉलसाठी एकच रांगा असल्याने खातेदारांचा गोंधळ उडत होता. त्यातून रांगेतील क्रमांकावरून खातेधारकांमध्ये वादाच्या घटना घडल्या.

दैनंदिन व्यव्हार विस्कळीत

चलनातून बाद नोटा बँकेत स्वीकारून दोन हजार रुपयांची नवीन नोट नागरिकांना देण्यात येत असली, तरी व्यवहारात शंभर, पन्नास व त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची उपलब्धता कमी असल्याने साधा भाजीपाला खरेदी करणेही नागरिकांसाठी अडचणीचे झाले आहे. आज आठवडे बाजारातही गर्दी नव्हती.


ग्राहक भांडारात घेणार जुन्या नोटा

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशातील शासकीय ग्राहक भांडारांमध्ये चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुसार धुळे शहरातील ग्राहक भांडारात पाचशे व हजारच्या जुन्या नोटा देऊन खरेदी करता येईल, असे ग्राहक भांडारचे अध्यक्ष अनिल मुंदडा यांनी पत्रकान्वये कळविले आहे. ग्राहक भांडारमध्ये १४ नोव्हेंबरपर्यंत पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.

आयुक्त उशिरापर्यंत थांबून

धुळे महापालिकेत दोन दिवसांत चार कोटींचा करभरणा झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. करापोटी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यत मनपा आयुक्त संगीता धायगुडे, अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी मनपात थांबून होते. शनिवारी दुपारपर्यंत तीन कोटी २३ लाखांपर्यंत मालमत्ता कराचा भरणा झाला असून, रात्रीतून ही रक्कम चार कोटींवर पोहोचेल, असा अंदाज मनपा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज