अ‍ॅपशहर

धुळे तहसील कार्यालयातील भिंती बाेलू लागल्या

जमिनीची खरेदी-विक्री करताना कोणती काळजी घ्यावी, ग्रामीण भागात शेतीसह घराच्या वाटणीवरून होणारे वादविवाद टाळण्यासाठी येथील प्रांताधिकारी कार्यालय तहसील या दोन्ही कार्यालयांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत.

Maharashtra Times 11 Apr 2017, 4:00 am
जमीन विक्रीबाबत मार्गदर्शनाचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhule tahsil office walls with full of information for peoples
धुळे तहसील कार्यालयातील भिंती बाेलू लागल्या


म. टा. वृत्तसेवा, धुळे

जमिनीची खरेदी-विक्री करताना कोणती काळजी घ्यावी, ग्रामीण भागात शेतीसह घराच्या वाटणीवरून होणारे वादविवाद टाळण्यासाठी येथील प्रांताधिकारी कार्यालय तहसील या दोन्ही कार्यालयांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. 'गोष्टीरूपी जमीन व्यवहारांची नीती' या शीर्षकाखाली प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संकल्पनेतून महसुली बोध कथांच्या फोटो फ्रेम लावण्यात आल्या आहेत. या बोधकथांमधून जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना काय करावे, काय करू नये, हे समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रांताधिकारी मिसाळ यांनी यापूर्वी हा प्रयोग जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे राबविला होता.

ग्रामीण भागात शेत जमिनींची खरेदी-विक्री, गहाण खत, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, जमिनीची वाटणी, सावकारी व्यवहार, कर्ज प्रकरणातून अनेक वेळा वादविवाद होतात. त्यातून काही वेळा गुन्हेही दाखल होतात. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी हे माहिती व्हावे, या उद्देशाने प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमासाठी गणेश मिसाळ यांना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळण्यास मदत होत असल्याची स्थिती आहे. याबाबत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या असून, निश्चितच शेतकरी बांधवांना जमीनविषयक कायदे नियम यांची माहिती होऊन त्यांची फसवणूक होणार नाही, असे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी माहिती देतांना सांगितले.

शेतकऱ्यांना फायदा

सांगली येथील जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी सामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेत गोष्टीरूपात जमीन व्यवहारांवर आधारित ९१ कथांचे लिखाण केलेले आहे. त्यांनी 'जमीन व्यवहार नीती' हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील मार्मिक कथांपैकी मोजक्या २५ कथांची निवड करून त्यांच्या ७५ फोटो फ्रेम तयार करून त्या काही दिवसांपूर्वीच प्रांताधिकारी धुळ्यासह साक्री येथील तहसील कार्यालयाच्या भिंतींवर लावण्यात आल्या आहेत. या प्रत्येक कथेच्या खाली कथेतून कोणता बोध घ्यावा याचीही माहिती देण्यात आली आहे. कामानिमित्ताने प्रांताधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांनी या कथा वाचून बोध घ्यावा, हा यामागील दृष्टिकोन आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज