अ‍ॅपशहर

सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी करावी

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता पथकाची मासिक सभा नियमितपणे घ्यावी.

Maharashtra Times 26 Aug 2017, 4:00 am
धुळे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टेंचे आदेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम do sudden investigation of the sonography centers in dhule
सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी करावी


म.टा.वृत्तसेवा,धुळे

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता पथकाची मासिक सभा नियमितपणे घ्यावी. ही सभा महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनापूर्वी घेऊन जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची अचानक तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा दक्षता समिती सदस्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. महेश मोरे, अॅड. रसिका निकुंभ, जयश्री शहा, विधी समुपदेशक मीरा माळी उपस्थित होते.

स्त्री-भ्रूण हत्या हा विषय गंभीर असून, ही हत्या टाळण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहभागाने प्रबोधनात्मक उपक्रम राबविताना या केंद्रांना वेळोवेळी अचानकपणे भेटी देवून पाहणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले. त्यामुळे स्त्री-भ्रूण हत्येचे प्रकार टळतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील केंद्रांना अचानकपणे भेटी दिल्या पाहिजेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर पीसीपीएनडी कार्यक्रमांतर्गत एकूण ६३ सोनोग्राफी केंद्र असून, त्यात दोन शासकीय, दोन शासकीय पशुवैद्यकीय, ५९ खासगी केंद्रे आहेत. त्यातील २६ सध्या कार्यरत असून, ३७ केंद्र धारकांनी स्वत:हून रेडिऑलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने बंद केले आहेत, असे डॉ. संजय शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा व तालुका सल्लागार समितीच्या कामकाजाचा आढावा, एफ फॉर्म ऑनलाइन भरणे, टोल फ्री क्रमांक, आमची मुलगी डॉट कॉम या संकेतस्थळासह इतर माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी उपाययोजना कराव्या, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले.

शिंदखेड्यात गर्भपात केंद्राची मान्यता रद्द

जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यक्षेत्रानुसार येणाऱ्या सर्व एमटीपी, सोनोग्राफी केंद्र तसेच बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत रजिस्टर रुग्णालये असे एकूण ७५ रुग्णालयांची धडक मोहिमेंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शिरपूर येथील १, शिंदखेडा येथील १ व दोंडाईचा येथील तीन गर्भपात केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. संबंधितांनी खुलासे सादर केले असून, त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत पुन्हा या केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात शिंदखेडा येथील गर्भपात केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली असून, इतर गर्भपात केंद्रांनी त्रुटींची पूर्तता केलेली आहे, असेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज