अ‍ॅपशहर

खडेश्वर बाबा मठात चोर शिरले, महंतांच्या अंगठ्या लुटल्या, देवघरावर नजर पडताच म्हणाले, नको...

crime news : महंतांच्या खोलीतून निघालेल्या चोरट्यांचे खडेश्वर महाराजांच्या मूर्तीवरील चांदीच्या मुकुटाकडे लक्ष गेले. परंतु देवाचा मुकुट नको असे एका चोरट्याने इतर दोघांना सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2023, 9:58 pm
हिंगोली : हिंगोली शहरालगत खटकाळी भागात खडेश्वर बाबा मठामध्ये महंतांच्या कानावर पिस्तूल रोखून तीन चोरट्यांनी अलमारीमधील सोन्याच्या अंगठ्या पळविल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी देवासमोर प्रामाणिकपणा दाखवत 'देवाचा मुकूट नको' असे म्हणत, तो घेतला नाही. ही घटना आज घडली. याप्रकरणी गुरुवारी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hingoli Mahant Loot 900
हिंगोलीत महंतांची लूट


हिंगोली शहरातील खटकाळी भागामध्ये खडेश्वरबाबा यांचा मठ आहे. या ठिकाणी महंत सुमेरपुरी महाराज मठाचे सर्व कामकाज बघतात. नेहमीप्रमाणे सुमेरपुरी महाराज आरती व धार्मिक कार्यक्रम करून रात्री मठामध्ये असलेल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे मठाच्या पाठीमागील भागातून आत आले.

मठात कोणीतरी आले आहे हे लक्षात घेऊन महंत सुमेरपुरी महाराज यांनी त्या तिघांना विचारणा केली. मात्र यावेळी त्यापैकी एकाने खंजीर काढून सुमेरपुरी महाराज यांना खोलीत घेऊन चलण्याबाबत दम दिला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते घाबरून गेले. चोरट्यांनी त्यांना धरून खोलीमध्ये नेले. यावेळी अन्य एका चोरट्याने त्यांच्या कानपट्टीवर पिस्तूल रोखून अलमारीची चावी मागितली. त्यांनी चावी देताच चोरट्यांनी अलमारी उघडून कपाटातील सोन्याच्या तीन ते चार अंगठ्या ताब्यात घेतल्या. यावेळी महंतांना मारहाण देखील केली.

खोलीतून निघालेल्या चोरट्यांचे खडेश्वर महाराजांच्या मूर्तीवरील चांदीच्या मुकुटाकडे लक्ष गेले. मात्र देवाचा मुकुट नको असे एका चोरट्याने इतर दोघांना सांगितले. त्यानंतर तिघेही मुकुट न घेताच निघून गेले. मात्र जाताना चोरट्यांनी एकाजवळ असलेला मोबाईल देखील नेला.

हेही वाचा : आई मला माफ कर, तुला चांगले दिवस दाखवायची इच्छा होती, CA ची तयारी करणाऱ्या तरुणाचं टोकाचं पाऊल

सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू

आज सकाळी या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडित कचवे जमादार संजय मार्के, शेषराव पोले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, सुनील गोपीनवार, जमादार सुनील अंभोरे, भगवान आडे, गजानन पोकळे, शेख शकील, किशोर सावंत यांच्या पथकाने ही भेट दिली आहे पोलिसांनी आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालवला आहे.

हेही वाचा : मम्मी-पप्पा दार उघडा, मुलगा हाका मारत राहिला, मात्र बंद दरवाजाआड घडत होतं भयंकर

महत्वाचे लेख