अ‍ॅपशहर

अपघातात बालकाचा मृत्यू

घंटागाडी येत नसल्याने कुंडीत कचरा टाकण्यासाठी काकांसोबत गेलेल्या बालकाला भरधाव डम्परने धडक दिली. या अपघातात बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता निमखेडी रस्त्यावर घडली.

Maharashtra Times 20 Apr 2017, 4:00 am
निमखेडी रस्त्यावरील दुर्घटना; घटनेनंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accident death of a child
अपघातात बालकाचा मृत्यू


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

घंटागाडी येत नसल्याने कुंडीत कचरा टाकण्यासाठी काकांसोबत गेलेल्या बालकाला भरधाव डम्परने धडक दिली. या अपघातात बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता निमखेडी रस्त्यावर घडली. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने डम्परच्या काचा फोडून डम्पर पेटवून दिला. यात डम्परची कॅबिन पूर्णत: जळून खाक झाली. तर डम्परचालक हा घटनास्थळावरून फरार झाला. दक्ष कैलास भदाणे (वय ३) असे मृत बालकाचे नाव आहे.

निमखेडीजवळील हितवर्धनी सोसायटीत कैलास दगडू भदाणे (वाणी) हे आई-वडील, पत्नी तसेच तीन भावांसह एकत्र राहतात. घरापर्यंत महानगरपालिकेची घंटागाडी येते नसल्याने बुधवारी, सकाळी कैलास भदाणे यांचा तीनवर्षीय मुलगा दक्ष (देवांश) हा काका विनोद व चुलतभाऊ धीरज, यश यांच्यासोबत निमखेडी रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडला होता.

काळाचा आघात

कचरा टाकल्यानंतर घराकडे परतत असताना निमखेडीकडून भरधाव येणाऱ्या वाळू डम्परने (एमएच १९, वाय ३७५७) दक्ष याला धडक दिली. चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेल्या दक्ष याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ नेले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले.

जमाव संतप्त

ही घटना घडताच डम्परचालक घटनास्थळावरून फरार झाला. तर घटनेनंतर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी त्याठिकाणी जमली होती. वाळू वाहतूक करणाऱ्या टँकरमुळे चिमुरड्याचा प्राण गेल्याने जमलेल्या नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. या उद्रेकात संतप्त जमावाने डम्परची तोडफोड करून काचा फोडल्या आणि डम्परला पेटवून दिले.

वाळू वाहतुकीचाच बळी

निमेखडीतील गिरणा नदी पात्र असल्यामुळे त्या ठिकाणाहून वाळू माफियाकडून नेहमीच अवैध वाळू वाहतुक केली जाते. त्यामुळे निमखेडी रस्त्यावर लहान-मोठे अपघात होतात. मात्र, या डम्परचालकांवर पोलिसांकडूनही कारवाई होत नाही. या अवैध वाळू वाहतुकीवर आळा बसवून वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज