अ‍ॅपशहर

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवण्याबाबत सरकारने आश्वासन दिले होते.

Maharashtra Times 18 Jul 2017, 4:00 am
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत महामोर्चा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anganwadi workers womens march for her honorarium
अंगणवाडी सेविकांचा मोर्चा


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवण्याबाबत सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांच्या मानधनात वाढ झाली नसल्याने जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारी (दि. १७) जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

राज्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी करून देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी, राज्यातील सर्व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा वाजता हा मोर्चा काढून लक्ष वेधले. संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चा यशस्वीतेसाठी सुषमा चव्हाण, मंगला नेत्रे, मीनाक्षी चौधरी, पुष्पा गवळी, पुष्पा परदेशी, सविता महाजन, साधना पाटील आदींचे सहकार्य लाभले.

अन्यथा सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सेवा समाप्ती लाभामध्ये सुधारणा करून जास्त सेवा, जास्त लाभ याप्रमाणे सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना भविष्यनिर्वाह निधी लागू करण्यात यावा. आजारपणाची रजा तसेच उन्हाळी सुटी भरपगारी लागू करण्यात यावी, यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. सदरच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला असून, या मागण्या मान्य न झाल्यास ४ ऑगस्टला राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यांपासून अंगणवाडी केंद्र बंद करून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज