अ‍ॅपशहर

बाजरीचा कट्टा घेण्यासाठी शहरात गेला, घरी पोहोचण्यापूर्वी अनर्थ घडला, ४ मुलांचं पितृछत्र हरपलं

Jalgaon Mhasawad Two Wheeler Accident : चार मुलाचं पितृछत्र हरपल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुलं पोरकी झाली आहेत. जळगावमध्ये ही घटना घडली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2023, 10:49 am
जळगाव : बाजरीचा कट्टा घेऊन तरुण दुचाकीवरून घराकडे परतत होता. यावेळी प्रवासात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी झाडावर आदळली. आणि या अपघातात घरी पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नागदूली ते पद्मालय मंदिराच्या प्रवेशद्वारदम्यान घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jalgaon Accident News
बाजरीचा कट्टा घेण्यासाठी शहरात गेला, घरी पोहोचण्यापूर्वी अनर्थ घडला, ४ मुलांचं पितृछत्र हरपलं


जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे योगेश गायकवाड हा तरुण पत्नी सुरेखा आणि चार मुलांसह वास्तव्याला होता. शेती व सेंट्रींगचे काम करून तो आपला उदरनिर्वाह भागवित होता. मंगळवारी योगेश हा बाजरीचा कट्टा घेण्यासाठी त्याच्या दुचाकीने एरंडोल शहरात गेला होता. बाजरीचा कट्टा घेतल्यानंतर सायंकाळी ७ वाजता योगेश पुन्हा म्हसावदला घराकडे परतत होता. नागदुली गावाजवळ योगेशचं दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटलं. यामुळे त्याची दुचाकी थेट रस्त्यालगतच्या कडुलिंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात योगेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वेसाठी ३२ वर्ष सेवा पण निवृत्तीदिवशी रेल्वेनेच घात केला, अपघात कशामुळे? जळगावच्या सुरेशरावांसोबत काय घडलं?
नागदुली गावासह परिसरातील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आलं. यावेळी वैद्यकीय अधिकारी तपासून त्याला मृत घोषित केलं. बुधवारी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून योगेश याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.


या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे. बाजरी घेण्यासाठी सकाळी गेलेला पती योगेश हा सायंकाळ होवून घरी परतला नाही. यामुळे पत्नी सुरेखा ही योगेशची प्रतिक्षा करत होती. मात्र तिला योगेशचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. योगेशच्या या अपघाती मृत्यूने त्याच्या चार मुलांचं पितृछत्र हरपलं आहे. या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वाचे लेख