अ‍ॅपशहर

छत कोसळून बालकाचा मृत्यू

तांबापुरा झोपडपट्टीत पार्टिशनच्या घरावरील पन्हाळी पत्रे गळत असल्याने प्लस्टिक ताडपत्री टाकताना छत कोसळून झोळीतील दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Maharashtra Times 31 Jul 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम child died due to slab fall
छत कोसळून बालकाचा मृत्यू


तांबापुरा झोपडपट्टीत पार्टिशनच्या घरावरील पन्हाळी पत्रे गळत असल्याने प्लस्टिक ताडपत्री टाकताना छत कोसळून झोळीतील दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तांबापुरा अजमेरी गल्लीतील रहिवाशी रऊफ पटेल छतावर प्ल‌ास्टिकची ताडपत्री टाकत असताना दुपारी एक वाजता ही घटना घडली.

अचानक संपूर्ण छत कोसळल्याने गल्लीतील महिला-पुरुषांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी पित्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तांबापुरातील अजमेरी गल्लीत रऊफ हकीम पटेल (वय ३०) पत्नी साजेदाबी, मुली हुमेरा (वय ५), रोजमीन (वय ३) आणि मुलगा असद यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते रद्दी-भंगार गोळा करुन कुटूंबाची गुजराण करतात. पावसाळा सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून छत गळत होते. रात्री जोरात पाऊस आला तरी घरात झोपता येईना, म्हणून छतावर टाकण्यासाठी प्लास्टिक ताडपत्री आणली. रविवार उसंतीचा दिवस म्हणून दुपारी एक वाजता रऊफ पटेल छतावर ताडपत्री टाकत होते.

वजन पेलवले नाही

एका बाजूने ताडपत्री टाकून झाल्यावर पुढे सरकवत असतानाच छताच्या मधोमध असलेल्या आडव्या बल्लीवर वजन पडून काही क्षणातच छत कोसळले. खाली छताला आधार देणाऱ्या लाकडी खांबाला बांधलेल्या झोक्‍यात असद झोपलेला होता. छतावरचे दगड, पत्रे आणि खालून डोक्‍याला जोरदार फटका बसल्याने या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. छत पडल्याने रऊफ पटेल याच्याही अंगावर पत्रा पडला. त्यांच्या पायाचे बोट कापले गेले. तत्काळ दोघा बापलेकांना जिल्हा रुग्णालय व तेथून रऊफ पटेल यांना डॉ. भंगाळे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यावर औद्योग‌िक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जखमींच्या जबाबानंतर याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करुन दुर्घटनेच्या कारणांचा तपास करण्यात येईल, अशी माहीती पोलिसांनी दिली.


कुटुंबियांचा आक्रोश

असद हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. कुंटुबियांसह परिसरातील नागरिकांचाही तो लाडका होता. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुटुंबियांसह नागरिकांनी प्रचंड आक्रोश केला. असदच्या जन्मानंतर तो काही महिने सतत आजारी राहत होता. दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्याची प्रकृती पूर्णपणे बरी झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज