अ‍ॅपशहर

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात आता शहर व जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला पेट्रोल व डिझेलचा अभिषेक करून काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.

Maharashtra Times 19 Sep 2017, 4:00 am
सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress movement against petrol diesel price hike at jalgoan
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात आता शहर व जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला पेट्रोल व डिझेलचा अभिषेक करून काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.

केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महागाई कमी करण्याऐवजी वाढत असल्याने केंद्र सरकारचा निषेध जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करून करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, डी. जी. पाटील, अॅड. अविनाश पाटील, उदयसिंग पाटील, राजस कोतवाल, संजय वराडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोदी महाराज प्रसन्न व्हा

यावेळी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला हळद, कुंकु लावून पूजा केली. तसेच पेट्रोल व डिझेलचा अभिषेकही करण्यात आला. ‘मोदी महाराज आता तरी प्रसन्न व्हा व इंधनाची दरवाढ कमी करा’ असे साकडे या आंदोलकांनी घातले. यावेळी ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा’, ‘बस हो गई मन की बात’, ‘अब करो काम की बात’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. पेट्रोलची किंमत ४० रुपये असून, त्यावर ३० रुपये मोदी टॅक्स व १० इतर टॅक्स असल्याचा उपहास डॉ. राधेशाम चौधरी यांनी केला. त्यांनी हा मोदी टॅक्स कमी करण्याच्या घोषणा दिल्या.

आश्वासनांची पूर्तता करा

यावेळी काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, गेल्या ७२ दिवसांत पेट्रोलमध्ये १६ रुपये तर डिझेलमध्ये ४ रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने दिलेल्या महागाई कमी करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम अन्नधान्य, दूध, भाजीपाल्याच्या दरावर झाल्याने सामान्य जनतेला फटका बसला आहे. उद्योगांवरदेखील याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ दखल घेवून इंधनाची दरवाढ कमी करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज