अ‍ॅपशहर

मंत्रिमंडळातून हटविण्यासाठी षडयंत्र

‘मला मंत्रिमंडळातून हटविण्यासाठी नियोजनबद्ध षडयंत्र रचण्यात आले होते. या प्रकरणी माझ्या नावाचे बनावट धनादेश देऊन ते हायकोर्टात दाखल करण्यात आले’, अशी खळबळजनक माहिती भाजपचे ज्येष्ठनेते आमदार एकनाथ खडसे यांनी बुधवारी भुसावळला आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra Times 14 Jun 2018, 3:40 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम conspiracy to remove from the cabinet says mla eknath khadse in bhusawal press conference
मंत्रिमंडळातून हटविण्यासाठी षडयंत्र


‘मला मंत्रिमंडळातून हटविण्यासाठी नियोजनबद्ध षडयंत्र रचण्यात आले होते. या प्रकरणी माझ्या नावाचे बनावट धनादेश देऊन ते हायकोर्टात दाखल करण्यात आले’, अशी खळबळजनक माहिती भाजपचे ज्येष्ठनेते आमदार एकनाथ खडसे यांनी बुधवारी भुसावळला आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणी मुक्तार्इनगर पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुऱ्हाडे, सदाशिवन सुब्रमण्यम, चारमन फर्नस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीदेखील आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळातून हटविण्यासह बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध मोठे षडयंत्र रचण्यात आले. समाजसेविका कल्पना इनामदार यांच्यानुसार यात एका मंत्र्याचाही समावेश असल्याचा गौप्यस्फोटदेखील खडसे यांनी केला. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून, त्यांनी न्यायालयात सादर केलेले कागदपत्रेही बनावट असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहुतांश कागदपत्रे बनावट
आमदार खडसेंनी अवैध मालमत्ता जमविल्याचा आरोप करत दमानिया यांनी २०१६ मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी अनेक कागदपत्रेही सादर केली तसेच ही सर्व कागदपत्रे खरी असल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहून दिले होते. मात्र, यातील बहुतांश कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. याबाबत खडसे म्हणाले की, नऊ कोटी ५० लाख रुपये व दहा लाख रुपयांचा चेक माझ्या नावाने दिला असल्याचा उल्लेख आहे. मात्र, हे दोन्ही चेक माझे नसून बनावट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. तत्कालीन पोलिस अधीक्षक जालिंधर सुपेकर यांनीही चौकशी करून हे धनादेश बनावट असल्याचे निष्पन्न केले होते, असेही खडसे म्हणाले.

पोलिसांवरही दबाव
धनादेश बनावट असल्याचे कोर्टातून प्रमाणित केल्यावर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिस अधीक्षकांशीही चर्चा करूनही गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल दीड महिना टाळाटाळ करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांवर कुणाचातरी दबाव असल्याचा आरोपही खडसे यांनी केला. मुक्ताईनगर न्यायालयात याचिका दाखल करीत मंगळवारी दिवसभर सुनावणी झाल्यानंतर अंजली दमानिया यांच्यासह पाच जणांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्यास कलमांचाही समावेश असल्याने यांना केव्हाही अटक होऊ शकते, असेही आमदार खडसे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज