अ‍ॅपशहर

कंत्राटी कामगाराचा मृत्यू

शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा सुनील चिंतामण चौधरी हा युवक मंगळवारी (दि. २४) एमआयडीसीतील एफ ३५ येथे असलेल्या गीतांजली केमिकल या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाला होता.

Maharashtra Times 30 Oct 2017, 4:00 am
विषारी केमिकलमुळे साठ टक्के भाजले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम contract workers death due to chemical at jalgaon midc
कंत्राटी कामगाराचा मृत्यू


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा सुनील चिंतामण चौधरी हा युवक मंगळवारी (दि. २४) एमआयडीसीतील एफ ३५ येथे असलेल्या गीतांजली केमिकल या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाला होता. कंपनीत गुरुवारी (दि. २६) झालेल्या एका घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले होते. त्यापैकी सुनीलचा शनिवारी (दि. २८) रात्री उपचार घेताना मृत्यू झाला.

एमआयडीसीतील गीतांजली केमिकल या कंपनीत गुरुवारी (दि. २६) उत्पादन विभागात काम करीत असताना सुनीलच्या डोक्यावर असलेल्या लूप रिअॅक्टरचा पाईप लिक झाला. यावेळी जॉईंटमधून विषारी केमिकल खाली पडल्यामुळे सुनीलसह प्रकाश बळीराम तीवणकर (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे भाजले गेले होते. या घटनेनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दोघांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दोघे सुमारे ६० टक्के भाजले गेल्याने त्यांचे शरीर काळे पडले होते. गंभीर दुखापत झालेले दोघेजण उपचार घेत असताना शनिवारी रात्री ८ वाजता सुनीलची प्राणज्योत मालवली. तर तीवणकर हे अद्याप उपचार घेत आहेत.

दरम्यान, सुनीलच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंपनीचा हलगर्जीणामळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. सुनीलचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात असताना नातेवाईक, समाजबांधवांनी कंपनीत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

काँग्रेस पक्षाचे डॉ. राधेशाम चौधरी यांच्या नेतृत्वात सुनीलच्या समाजबांधवांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून, दहा दिवसांत व्यवस्थापन मंडळ निर्णय घेऊन मदत करू, असे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनीलचे दोन वर्षांपूवी लग्न झाले आहे. त्याच्या पश्चात पत्नी कौशल्या, एक वर्षाचा मुलगा हर्षल, आई गंगूबाई व वडील चिंतामण पाटील असा परिवार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज