अ‍ॅपशहर

हंजीर प्रकल्प कचऱ्याने फुल्ल!

जळगाव महापालिकेने बीओटी तत्त्वावर हंजीर बायोटेक या कंपनीला चालविण्यास दिलेला घनकचरा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. प्रकल्प बंद असला तरी याठिकाणी दररोज मनपातर्फे जळगावातील सुमारे १२० टन कचरा टाकला जात आहे.

Maharashtra Times 29 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hanjeer project full of garbage at jalgaon
हंजीर प्रकल्प कचऱ्याने फुल्ल!


जळगाव महापालिकेने बीओटी तत्त्वावर हंजीर बायोटेक या कंपनीला चालविण्यास दिलेला घनकचरा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. प्रकल्प बंद असला तरी याठिकाणी दररोज मनपातर्फे जळगावातील सुमारे १२० टन कचरा टाकला जात आहे. आता या प्रकल्पांवरील कचरा ओव्हर फ्लो झाला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या ट्रॅक्टरमधून प्रकल्पाच्या रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने या परिसराजवळील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेने २००७ मध्ये हंजीर बायोटेक या कंपनीला जळगाव शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा मक्ता दिला होता. यासाठी आव्हाणे शिवारातील ६ हेक्टर ५३ आर जागा जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळवून घनकचरा प्रकल्पासाठी या कंपनीला मनपाने दिली होती. शहरातील रोज जमा होणारा १२० टन कचरा मनपाकडून येथे टाकण्यात येतो. मक्तेदार या कचऱ्यावर पाच प्रकारच्या प्रक्रिया करून खतनिर्मिती करीत असे. मात्र जुलै २०१३ मध्ये मक्तेदार काम अचानक बंद करून कर्मचाऱ्यांसह निघून गेला.


२ लाख टन कचरा प्रक्रियेविना

जळगाव शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या घनकचरा प्रकल्पाचे काम कित्येक दिवसांपासून थांबलेले आहे. तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज या प्रकल्पाच्या जागेवर सरासरी १२० टन कचरा टाकला जातो. गेल्या चार वर्षांपासून येथे सुमारे २ लाख टनांपेक्षा जास्त कचरा प्रक्रियेविना पडून आहे. या कचऱ्यावर कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया न करता केवळ डम्प करण्यात येत आहे. दुर्गंधीने या भागाजवळील रहिवाशी हैराण झाले आहेत. तसेच जल व वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याला आग लागून धुराचे लोट पसरत असतात. रहिवाशांसह परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनादेखील श्वसनाचे विकार जडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वाहतुकीचा प्रश्न

मनपाकडून पोकलँड मशिनच्या साह्याने केवळ कचरा डम्प केला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाचे येथे असलेले पोकलँड मशिनदेखील त्यांनी परत घेतले आहे. त्यामुळे कचरा डम्पदेखील करता येत नसल्याने ओव्हर फ्लो होवून ट्रॅक्टर जायलाही जागा उरलेली नाही. या प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यात कचरा टाकला जात असल्याने निमखेडी परिसरातील नवीन उपनगरांमधील नागरिकांना वाहतुकीचा प्रश्न सतावत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज