अ‍ॅपशहर

पिंप्राळ्यात आज ऐतिहासिक रथोत्सव

पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४१ वर्षांची परंपरा असलेला पिंप्राळा रथोत्सव आज (दि. ४) साजरा होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या रथोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली आहे.

Maharashtra Times 4 Jul 2017, 4:00 am
१४१ वर्षांची परंपरा; उत्सवासाठी तयारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम historical rathotsav in pimprala today
पिंप्राळ्यात आज ऐतिहासिक रथोत्सव


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४१ वर्षांची परंपरा असलेला पिंप्राळा रथोत्सव आज (दि. ४) साजरा होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या रथोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली आहे. प्रिंप्राळा रथोत्सवाचे यंदाचे १४२ वे वर्ष आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला हा रथ वाजतगाजत काढण्यात येतो.

या रथोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता पंढरीनाथ विठ्ठलशेठ वाणी यांच्या हस्ते अभिषेक करून ११.३० वाजता महापूजा करून केली जाईल. यंदा सुरेश मुरलीधर वाणी यांना महापूजेचा मान मिळाला आहे. दुपारी १२ वाजता माजी आमदार सुरेश जैन यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उपमहापौर ललीत कोल्हे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. रथोत्सवासाठी विठ्ठल मंदिर संस्थान कार्यकारिणीतील सदस्य परिश्रम घेत आहेत. महाआरती झाल्यावर रथाच्या प्रदक्षिणेसाठी प्रस्थान होईल. त्यापूर्वी भाविकांच्या हस्ते रथाला मोगरी लावण्यात येईल. या रथाला पिंप्राळ्यातील चावडीपासून सुरुवात होईल. त्यानंतर रथ कुंभारवाडा, मढी चौक, धनगर वाडा, मशिद, गांधी चौक, मारूती मंदिरमार्गे रात्री साडेआठला पिंप्राळ्यातील चावडीजवळ येईल. रथाच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात येणार आहे. रथावर विद्युत रोषणाईदेखील केली जाणार आहे.

सासुरवाशीण येतात माहेरी

पिंप्राळा रथोत्सवाची परंपरा १४० वर्षांपासूनची आहे. रथाच्या दिवशी पिंप्राळ्यात मोठी यात्रा भरते. पिंप्राळ्यातील माहेरवाशीण खास रथोत्सवासाठी सासरहून येतात. रथोत्सवासाठी म्हणून ‘पंजरी प्रसाद’ तयार केला जातो. त्यात धने, गूळ, खोबरे, सुंठ व विलायची हे पाच घटक असतात. जवळपास सात ते आठ तास हा रथोत्सव चालणार आहे, अशी माहिती रथोत्सव समितीकडून देण्यात आली आहे. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी तसेच या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी भाविक जिल्ह्यातून उपस्थित राहतात.

दिंडी सोहळा

जळगावजवळील सावखेडा बु. येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित, श्रवण विकास मंदिर या कर्णबधिर विद्यालयात बुधवारी आषाढी एकादशीनिमित्त शालेय परिसर ते मातोश्री वृद्धाश्रम सावखेडा शिवार येथे शाळेतील चिमुकल्या दिव्यांग वारकरी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक वृंदाने पंढरपूरच्या वारीचा दिंडी सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. शाळेतील दिव्यांग कर्णबधिर विद्यार्थी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाप्रमाणे वेशभूषा परिधान करून गळ्यात तुळशी माळ, हातात टाळ घेऊन आनंदाने पावली नृत्य सादर करत दिंडीत सहभागी झाले होते. सुरुवातीला मुख्याध्यापक पद्माकर इंगळे यांनी पालखीचे पूजन केले. याप्रसंगी अंश मौर्य याने विठ्ठलाची तर वेदिका सोनार हीने रुख्मिणीची वेशभूषा करून मने जिंकली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज