अ‍ॅपशहर

छेड काढल्यावरून राजकीय नेत्यांत वाद

मुलीच्या छेड काढल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्यामध्ये रामानंद नगर पोलिस ठाण्यात समोरासमोर जुंपण्याची घटना सोमवारी (दि. २७) दुपारी २ वाजता घडली.

Maharashtra Times 28 Nov 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city crime news
छेड काढल्यावरून राजकीय नेत्यांत वाद


मुलीच्या छेड काढल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्यामध्ये रामानंद नगर पोलिस ठाण्यात समोरासमोर जुंपण्याची घटना सोमवारी (दि. २७) दुपारी २ वाजता घडली. या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत अपशब्द उच्चारल्याचा आरोप शिवसेनेच्या शोभा चौधरी यांनी केला.

शिक्षणासाठी समर्थ कॉलनीत भाड्याने रूम घेवून राहणारी तरुणी रविवारी (दि. २६) दुपारी २ ते २:३० वाजेच्या वाजता जेवण झाल्यानंतर घराकडे परतत होती. प्रभात चौकातील डॉ. नारखेडे यांच्या दवाखान्यासमोरून जात असताना बुलेटस्वार (एमएच. १९, बीडब्ल्यु. ३९००) तरुणाने तिची छेड काढत हात पकडण्याचा प्रयत्न केला तसेच शिवीगाळ केली. भयभित झालेल्या तरुणीने इतर मैत्रिणींना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार त्यांनी शिवसेनेच्या शोभा चौधरी यांना सांगितला. रविवारीच रामानंदनगर पोलिस ठाणे गाठत घटनेची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी (दि. २७) शोभा चौधरी यांनी तरुणींसह पोलिस निरीक्षक बी. जे. रोहम यांची भेट घेऊन संपूर्ण हकिकत सांगितली. पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. छेड काढणारा तरुण हा राष्ट्रवादी पक्षाचे तसेच माजी जि. प. सदस्य रमेश माणिक पाटील यांच्या मुलगा असल्याचा आरोप तरुणी व शोभा चौधरी यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी रमेश पाटील यांना बोलवून घेतले होते. मुलाचे लग्न ठरले असून, रविवारी मुलगा दिवसभर घरातच होता. हा प्रकार राजकीय षडयंत्राचा आरोप रमेश पाटील यांनी केला.

पोलिस ठाण्यात जुंपली

पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर दोन्ही गट बाहेर आले. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात छेड काढल्याच्या कारणावरून शोभा चौधरी व रमेश माणिक पाटील यांच्यात शाब्दिक वाद होऊन दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आले. या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. गोंधळ सुरू असल्याचे पाहून रामानंदनगर पोलिसांनी तत्काळ वादात हस्तक्षेप घेत वाद निवळला. यानंतर तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून बुलेटस्वार तरुणाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पीएसआय जाधव हे करीत आहे. रामानंदनगर पोलिसांनी छेड काढणार्‍या बुलेटस्वार तरुणाची बुलेट जप्त केली आहे. पोलिसांतर्फे डॉ. नारखेडे यांच्या दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. त्या तपासातून बुलेटस्वार तरुण कोण हे निष्पन्न होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज