अ‍ॅपशहर

कौटुंबिक वादातून पतीचा पत्नीवर विळ्याने वार

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार केल्याची घटना बुधवारी (दि. १०) सायंकाळी साडेपाच वाजता कालिंका माता चौफुली परिसरात घडली. यावेळी जखमी महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, चेहऱ्यावर इजा झाली आहे.

Maharashtra Times 11 Jan 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city crime story
कौटुंबिक वादातून पतीचा पत्नीवर विळ्याने वार


कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार केल्याची घटना बुधवारी (दि. १०) सायंकाळी साडेपाच वाजता कालिंका माता चौफुली परिसरात घडली. यावेळी जखमी महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, चेहऱ्यावर इजा झाली आहे.

शहरातील महामार्गालगतच्या कालिंका माता चौफुलीजवळ अन्नपूर्णा साहेबराव शिंदे (वय ३३) या वास्तव्यास असून, त्याचठिकाणी त्या वराटे-पाटे विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पती साहेबराव शिंदे हा दारूच्या नशेत घरी येऊन पत्नी अन्नपूर्णा यांच्यासोबत वाद घातला. वाद वाढतच जाऊन साहेबराव याने चक्क घरातील विळा उचलून पत्नीच्या चेहर्‍यावर वार केला. यात त्या रक्तबंबाळ झाल्या. परिसरातील पोलिसाने त्या ठिकाणी धाव घेत महिलेस रिक्षातून उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले.

विकृताला चोप

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रफीक शेख हा रामानंदनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका महिलेचा पाठलाग करत होता. महिला जेथे जाईल तो तेथे मागे-मागे जावून अश्लील हातवारे करायचा. अखेर पाच ते सहा दिवसांपूर्वी महिलेने कुटुंबीयांना घडत असलेला प्रकार सांगितला. महिलेच्या पतीने लागलीच रामानंदनगर पोलिसात जाऊन पाठलाग करणाऱ्या व्यक्तीबाबत तक्रार दिली. अखेर बुधवारी (दि. १०) दुपारी रफीक शेख हा पुन्हा महिलेचा पाठलाग करून जवळ येऊन उभा राहिला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यास चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी महिलेचे कुटुंबीय व रफीक शेख याच्या मित्र मंडळींनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. शेख याची चौकशी करून कारवाई करण्यात आली.

संशयिताला चोप

तांबापुरा येथील एका घरात अश्लील कृत्य व गैरप्रकार सुरू असल्याचा संशय परिसरातील नागरिकांना आल्यानंतर त्यांनी घरात जाऊन दोन महिला व एका पुरूषाला विचारपूस करत चोप दिला. यानंतर त्यांना एमआयडीसी पोलिसात नेऊन त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु, त्याठिकाणी तसा काहीही प्रकार सुरू नसल्याचे चौकशीत समोर आले. परंतु, तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.

शेतकऱ्याची आत्महत्या

शेतात गुरांना चारा टाकून येतो, असे कुटुंबीयांना सांगून घराबाहेर पडलेल्या तरुण शेतकऱ्याने गळफास घेत मृत्यूला कवटाळल्याची घटना जळगाव तालुक्यात कराडदे शेतशिवारात मंगळवारी (दि. ९) रात्री घडली. भरत महारू पाटील (२८) असे मृताचे नाव आहे. भरत पाटील याचा अवघ्या नऊ महिन्यापूर्वीच थाटात विवाह झाला होता. मंगळवारी कुटुंबासहित जेवण केल्यानंतर शेतात गुरांना चारा टाकून येतो, असे सांगून हा तरुण घराबाहेर पडला. शेतात गेल्यानंतर त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. भरत हा कष्टाळू तसेच मनमिळाऊ स्वभावाचा होता. काही महिन्यापूर्वी त्याने दोन म्हशी घेतल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज