अ‍ॅपशहर

रंगारंग कार्यक्रमाने ‘जेसीएल’ला प्रारंभ

संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘आयपीएल’च्या धर्तीवर आयोजित केलेल्या ‘जेसीएल टी २०’ची सुरुवात रंगारंग कार्यक्रमाने झाली. मंगळवारी (दि. १२) पहिल्या दिवशी तीन सामने खेळवले गेले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये एम. के. वॉरिअर्स व रायसोनी अचिव्हर्स हे संघ विजयी झाले. तनेश जैन व योगेश तेलंग हे सामनावीराचे मानकरी ठरले.

Maharashtra Times 13 Mar 2019, 5:00 am
तनेश जैन व योगेश तेलंग हे सामनावीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_3469


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘आयपीएल’च्या धर्तीवर आयोजित केलेल्या ‘जेसीएल टी २०’ची सुरुवात रंगारंग कार्यक्रमाने झाली. मंगळवारी (दि. १२) पहिल्या दिवशी तीन सामने खेळवले गेले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये एम. के. वॉरिअर्स व रायसोनी अचिव्हर्स हे संघ विजयी झाले. तनेश जैन व योगेश तेलंग हे सामनावीराचे मानकरी ठरले.

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात जेसीएलचे पहिल्यांदाच आयोजन होत असल्याने सहभागी सर्व खेळाडूंचा उत्साह व जोश वाढलेला आहे. त्यामुळे जेसीएलचा पहिला विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. जेसीएलमध्ये सहा दिवसांत एकूण अठरा सामने होणार आहेत. पहिल्या सामना एम. के. वॉरिअर्स व वनीरा ईगल्स यांच्यामध्ये रंगला. सुरुवातीला संघ मालक आदर्श कोठारी व किरण महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते टॉस करण्यात आला.

एम. के. वॉरिअर्स, रायसोनी अचिव्हर्स विजयी
एम. के. वॉरिअर्सने टॉस जिंकत आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २० षटकांमध्ये त्यांनी सात गडी गमावत १७० धावा केल्या. एम. के. वॉरिअर्सतर्फे अंकित पटेलने ४ षटकात १५ धावा देत ४ गडी बाद केले. तनेश जैन यानेही २ गडी टिपले. हा सामना एम. के. वॉरिअर्स यांनी ३५ धावांनी जिंकला. दुसरा सामना रायसोनी अचिव्हर्स व के. के. कॅन्स थंडर्स यांच्यात झाला. रायसोनी अचिव्हर्सने २० षटकात ५ बाद २०७ धावा केल्या. रायसोनी अचिव्हर्सतर्फे सचिन चौधरीने ३ षटकात १९ धावा देत ३ बळी घेतले. अश्फाक शेख व चारुदत्त नन्नवरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. रायसोनी अचिव्हर्सने हा सामना ७४ धावांनी जिंकला. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत पहिल्या दिवसाचा तिसरा सामना खान्देश ब्लास्टर्स व मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स यांच्यात सुरू होता.

आज होणारे सामने
‘जेसीएल टी २०’ मध्ये आज (दि. १३) तीन सामने खेळविले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना सकाळी ९ वाजता खान्देश ब्लास्टर्स विरुद्ध स्पेक्ट्रम चॅलेंजर्स यांच्यात खेळविला जाईल. दुसरा सामना दुपारी ३ वाजता मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स विरुद्ध सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स यांच्यात तर तिसरा सामना सायंकाळी ७.१५ वाजता वनीरा ईगल्स विरुद्ध के. के. कॅन्स थंडर्स यांच्यात रंगणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज