अ‍ॅपशहर

‘पु.लं.’ चे विनोद जगण्याकडे नेतात

पु. ल. देशपांडे यांची शब्दांवर हुकूमत होती. त्यांच्या लेखनात सह अनुभूती होती. ‘पु.लं’चे विनोद जगण्याकडे नेणारे होते असे प्रतिपादन कवी, गीतकार प्रवीण दवणे यांनी केले.

Maharashtra Times 28 Dec 2018, 5:00 am
कवी दवणे यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_1514


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पु. ल. देशपांडे यांची शब्दांवर हुकूमत होती. त्यांच्या लेखनात सह अनुभूती होती. ‘पु.लं’चे विनोद जगण्याकडे नेणारे होते असे प्रतिपादन कवी, गीतकार प्रवीण दवणे यांनी केले.

राज्याच्या भाषा विभाग साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेसह मू. जे. महाविद्यालय मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मला उमगलेले ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे’ हा काव्यात्मक आणि संवादात्मक कार्यक्रम गुरुवारी (दि. २७) सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, लोककवी अरुण म्हात्रे, ‘मसाप’ पाचोऱ्याचे कार्याध्यक्ष प्रा. वासुदेव वले, केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, मसापचे कार्याध्यक्ष डॉ. किसन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुरेश तायडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. विद्या पाटील उपस्थित होते.

गीतकार प्रवीण दवणे यांनी पु. ल. देशपांडे यांचे व्यक्तिचरित्र मनोरंजक व उद्बोधक पद्धतीने मांडले. त्यांनी साहित्यात मांडलेली व्यक्तिचित्रे ही सामाजिक मानसिकतेची चित्रणे होती. ‘कानात सूर नाही व डोळ्यापुढे पुस्तक नाही’ असा माझा दिवस गेला नाही असे पु. ल. सांगून गेले असे दवणे म्हणाले. मराठी शाळा बंद पडत आहेत कारण आपण शिकणार इंग्रजी आणि ऐकणार मराठी अशा त्रिभंगलेल्या अवस्थेत समाज आहे. मराठी समृद्ध आहे मात्र आपल्याला समृद्धी न कळल्यामुळे आपण दरिद्री झालो आहोत, अशी खंतही दवणे यांनी व्यक्त केली. न वाचणारी मुले हे प्राध्यापकांचे दारिद्र्य असते असेही प्रवीण दवणे म्हणाले.

‘गदिमा’ उत्तम कवी
‘गदिमां’ची गीते सुश्राव्य अशा संगीतमय साथीने लोककवी अरुण म्हात्रे यांनी सादर केली. त्यांना प्रा. कपिल शिंगाणे, प्रा. देवेंद्र गुरव, प्रसाद कासार, प्रवीण कुमावत, मयुरी हरीमकर, कामिनी खैरनार यांनी साथसंगत केली. ‘गदिमा’ रचीत गीते म्हात्रे यांनी सादर केली. गदिमा हे व्यक्ती मनाचा वेध घेणारे गीतकार होते. त्यांनी चित्रपट गीतातून निसर्ग, प्रेम, नाते अशा विविध भावनांना भावविभोर करीत मने जिंकली. त्यांच्या गीतांना घराघरात गुणगुणले गेले. आज गदिमा यांच्या कलावंशांचे अनेक वारस निर्माण झाले आहेत, असे विचार म्हात्रे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. योगेश महाले यांनी केले. प्रसंगी केसीई संस्थेचे सचिव अॅड. प्रमोद पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. चारूदत्त गोखले, कवी अशोक कोतवाल, अशोक सोनवणे उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज