अ‍ॅपशहर

पारोळ्याला पाणी देणार

गिरणेचे पाणी बोरी व अंजनीत सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीष पाटील यांनी बुधवारपासून (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शुक्रवारी मागे घेण्यात आले.

Maharashtra Times 7 Oct 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parola water problem solve
पारोळ्याला पाणी देणार


गिरणेचे पाणी बोरी व अंजनीत सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीष पाटील यांनी बुधवारपासून (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शुक्रवारी मागे घेण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या लेखी आश्‍वासनानंतर हे उपोषण सोडण्यात आले.

गिरणा धरणातून बोरी व अंजनी धरणात पाणी सोडावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतिष पाटील यांच्या उपोषणामुळे प्रशासनासह सरकारवरील दबाव वाढत होता. गुरुवारी (दि.३) भाजपचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, शिवसेना नेते माजी आमदार सुरेश जैन यांनी उपोषणस्थळी पाटील यांची भेट घेवून पाठिंबा दिल्याने संपूर्ण राज्यात या उपोषणाची चर्चा झाली.

शुक्रवारी गिरीष महाजन यांनी उपोषणस्थळी डॉ. पाटील यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याबाबत त्यांना विनंती केली. मात्र लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा पवित्रा पाटील यांनी घेतला. यावेळी गिरणा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून महाजन यांनी लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर पाटील यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार सुरेश भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार अरूण पाटील, नीलेश पाटील, मंगला पाटील,उपस्थित होते.

उपोषणात पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक विकास पवार, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, जिल्हा परिषद सदस्या स्नेहा गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, माजी शहराध्यक्षा मिनल पाटील, महिला शहराध्यक्षा नीला चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते.

१५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय

जिल्ह्यात नद्या आणि धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा नाही. साधारणत: १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाची वाट बघावी लागते. त्यानंतर जिल्ह्यातील दुष्काळासंबंधी निर्णय घेता येतो. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस न झाल्यास गिरणा धरणातून बोरी व अंजनीत पाणी सोडण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन महाजन यांनी दिले. महाजन यांनी लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषण सोडत असल्याचे राष्ट्रवादीचे आ. डॉ. पाटील यांनी जाहीर केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज