अ‍ॅपशहर

विश्वशांतीसह पावसासाठी प्रार्थना

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांच्या रोजाची सांगता सोमवारी (दि. २६) हजारो बांधवांच्या सामूहिक नमाज पठणाने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात करण्यात आली.

Maharashtra Times 27 Jun 2017, 4:00 am
खान्देशात ईदनिमित्त मुस्लिम बांधवांची प्रार्थना; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prayer for rain with world peace at jalgoan eid prayer
विश्वशांतीसह पावसासाठी प्रार्थना


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांच्या रोजाची सांगता सोमवारी (दि. २६) हजारो बांधवांच्या सामूहिक नमाज पठणाने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात करण्यात आली. या विश्वशांतीसह ‘या अल्लाह बारिश का नुजुल फरमा’ अशा शब्दांत मुस्लिम बांधवांनी पावसासाठी प्रार्थना केली. प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. चिमुकलेही नवीन कपड्यांत आपल्या मित्रांना ईदच्या शुभेच्छा देत होते. बाजारपेठही खाद्य पदार्थांच्या तसेच कपड्यांच्या खरेदीने गजबजल्या होत्या.

पवित्र रमजान महिन्यात हजारो भाविकांनी रोजे ठेऊन अल्लाहचे स्मरण केले. या रमजान ईदनिमित्त शहरातील मशिदींमध्ये आकर्षक सजावट करून रोषणाई करण्यात आली होती. मशिदींच्या बाहेर गुलाबांसह अन्य फुलांच्या गाड्यांची गर्दी होती. जळगावातील इदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांची शहरातील अजिंठा चौफुलीपासून, टॉवर चौकाकडून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्यांची रेलचेल होती. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, डोक्यावर टोपी घालून लहानग्यांना घेऊन पायदळ मैदान गाठण्यात आले.

अजिंठा चौकाजवळील इदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज पठणास सुरुवात केली. देशात चांगला पाऊस होऊ दे, विश्वात शांतता नांदावी, देशातील बांधवांना एकत्र ठेव, प्रामाणिक बनव आणि या देशाला महासत्ता कर, अशी दुआँ अल्लाहकडे मुस्लिम बांधवांनी यावेळी केली. यावेळी हिलाल कमिटीचे अध्यक्ष करीम सालार उपस्थित होते. मौलाना उस्मानी यांनी नमाज पठण करून दुआँ मागितली. ईदनिमित्त सकाळपासूनच शहरात उत्साह व चैतन्याचे वातावरण होते. इदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. इदगाह मैदानावर आमदार सुरेश भोळे यांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.

याशिवाय शहरातील तांबापूरा, शनीपेठ, शाहू नगर या ठिकाणच्या मशिदींमध्येही मुस्लिम भाविकांची रेलचेल होती. याप्रसंगी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर सायंकाळी सुकामेवा, शेवयांचे दूधात एकत्रीकरण करून शिरखुर्म्यासाठी आप्तेष्टांना घरी बोलाविण्यात आले. रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाण्यासाठी नागरिकांची घाई गर्दी सुरूच होती.

सुन्नी ईदगाहवर नमाज

जळगावातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी सुप्रीम कॉलनीतील सुन्नी ईदगाह मैदानावर सुन्नी जामा मस्जिद भिलपुराचे पेश इमाम मौलाना जाबीर रजा रजवी यांच्या नेतृत्वात ‘नमाज ऐ ईद-उल-फित्र’ ईदची नमाज पठण केली. याप्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविकात जैन समुहाने इदगाह मैदानाला संरक्षक भिंत करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे आवाहन अयाज अली यांनी केले.

मौलाना नजमुल हक यांनी ‘तरीका-ए-नमाज’ अर्थातच नमाज पठणाचे महत्त्व सांगितले. मौलाना नजमुल हक व मौलाना मुफ्ती रेहान रजा यांनीही मार्गदर्शन केले. मौलान जुबेर आलम यांनी 'सलाती सलाम' म्हटले. यावेळी देशात चांगला पाऊस व्हावा, शांतता नांदावी, भारत महासत्ता व्हावी, शत्रूंपासून देशाचे रक्षण कर, चांगले आरोग्य दे, दहशतवाद व भ्रष्टाचार नाहीसा होऊ दे व आपसांत प्रेमभावना वाढीस लागू दे अशी दुआँ करण्यात आली.

यावेळी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली, मौलाना जाकीर रजा रजवी, मौलाना मुफ्ती रेहान रजा, मौलाना नजमुल हक, मौलाना मुफ्ती इन्तेखाब अशरफ यांच्यासह हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज