अ‍ॅपशहर

व्याघ्र दिनानिमित्त ‘टायगर रॅली’

जागतिक व्याघ्र दिवसाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण संस्था व वन विभागातर्फे मुक्तार्इनगर तालुक्यातील पट्टेदार वाघाच्या संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी दि. २८ व २९ जुलै रोजी टायगर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Times 27 Jul 2018, 4:00 am
डोलारखेडा वनक्षेत्रात उद्या प्रस्थान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tiger rally at jalgaon bhusawal dolarkheda on tiger day
व्याघ्र दिनानिमित्त ‘टायगर रॅली’


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जागतिक व्याघ्र दिवसाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण संस्था व वन विभागातर्फे मुक्तार्इनगर तालुक्यातील पट्टेदार वाघाच्या संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी दि. २८ व २९ जुलै रोजी टायगर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि. २८) रॅलीचे जळगावातून प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान रॅलीत जास्तीत जास्त वन्यजीवप्रेमींनी सहभाग घ्यावा यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेकडून जळगावात वाघाचे मुखवटे घालून जनजागृती करण्यात येत आहे.

जळगावातील काव्यरत्नावली चौकातून सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांचे हस्ते रॅलीला हिरवी झंडी दाखविण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास उप वनसंरक्षक डिगंबर पगार, एस. एस. दहिवले, सहाय्यक उप वनसंरक्षक एस. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत. रॅलीस हिरवी झेंडी मिळाल्यानंतर स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे पथनाट्य सादरीकरण करण्यात येईल. पुढे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुलीमार्गे भुसावळकडे प्रस्थान ठेवणार आहे. भुसावळ येथील नाहाटा कॉलेजच्या ‘हेल्पर’ पथनाट्य टीमद्वारे पथनाट्य सादरीकरण होणार आहे. दुपारी १ वाजता भुसावळ हायस्कूलमध्ये ‘अर्जुना’ संस्थेतर्फे व्याघ्रदूतांचे स्वागत व जनजागृती करण्यात येणार आहे. यानंतर शहरातील बाजारपेठ पोलिस स्टेशन येथे जनजागृतीपर पथनाट्य होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.


पथनाट्याच्या माध्यमातून जागृती
ही रॅली उद्या दुपारी ३ वाजता डोलारखेडाकडे जाण्यास निघेल, दुपारी ४ वाजता मुक्ताईनगर मुख्य चौकात पथनाट्य झाल्यानंतर आमदार एकनाथ खडसे यांच्यातर्फे रॅलीस हिरवी झेंडी दाखवून पुढील मार्गासाठी रवाना करण्यात येईल. पुढे ही रॅली सायंकाळी ५ वाजता डोलारखेडा येथे वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण रॅलीचे स्वागत करतील. त्यानंतर रात्री ८ वाजता प्रोजेक्टरद्वारे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमानंतर विश्रांती असेल. रविवारी (दि. २९) दिवसभर डोलारखेडा वनक्षेत्रातील गावांमध्ये व रावेर तालुक्यातील गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर फैजपूर येथे रॅलीचा समारोप होऊन जळगावकडे रवाना होणार आहे. रॅलीमध्ये विविध ठिकाणी पथनाट्य, डॉक्युमेंट्री, पत्रक वाटप करून ‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’ हा संदेश दिला जाणार असल्याची माहिती संयोजक बाळकृष्ण देवरे यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज