अ‍ॅपशहर

जळगावात खळबळ; प्लास्टिकच्या खुर्चीत आढळला महिलेचा जळालेला मृतदेह

जळगाव शहरात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. ही आत्महत्या नसून घातपात आहे असा आरोप मृत महिलेच्या भावानं केला आहे.

Authored byप्रविण चौधरी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Mar 2022, 3:40 pm
जळगाव: शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत बुधवारी सायंकाळी सहा वाजता प्लास्टिकच्या खुर्चीत बसलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय तिच्या भावाने व्यक्त केला आहे. जयश्री बळवंत नेरे (वय ५३, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jayashree-Nere
जयश्री नेरे


याबाबत मृत जयश्री यांचे भाऊ सुजीत जाधव यांनी सांगितले की, पंचवीस वर्षांपूर्वी जयश्री यांचे लग्न जिल्हा नियोजन कार्यालयात नोकरीस असलेले बळवंत पंडीतराव नेरे यांच्याशी झाले. मुलबाळ होत नसल्यामुळे नेरे दाम्पत्यामध्ये वाद होते. बळवंत नेरे यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी भारती रघुनाथ भांडारकर यांच्याशी लग्न केले. या लग्नास आमचा विरोध असताना देखील बेकायदेशीरपणे हे लग्न केले. दरम्यान, या तणावामुळे जयश्री यांची मानसिक स्थिती खराब झाली. त्यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून औषधोपचार सुरू होता.

वाचा: राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून का गेले?; नाना पटोलेंनी सांगितलं खरं कारण

नेरे यांना दुसरी पत्नी भारती यांच्याकडून मुलगी झाली. यानंतर दोघेजण जयश्री यांचा छळ करीत होते. जयश्री यांनी माहेरी निघून जावे म्हणून त्यांना अपमानास्पद वागणूक देत होतेे. दरम्यान, दोन मार्च रोजी सायंकाळी साडे सहा वाजता जयश्री यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह घरातील प्लास्टिकच्या खुर्चीत आढळून आला. जयश्री यांनी स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली, अशी माहिती पती बळवंत नेरे यांनी मेहुणे सुजीत यांना दिली. तसेच मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणून ठेवला. मृतदेहाची अवस्था पाहून सुजीत यांना संशय आला. त्यांनी मेहुणे नेरे यांना विचारणा केली. ‘मी पेन्शनच्या कामासाठी कार्यालयात गेलो होतो तर भारती मुलीसह तिच्या आईला भेटण्यासाठी माहेरी गेली होती’ असे उत्तर नेरे यांनी दिले. हा सर्व प्रकार संशयास्पद असून नेरेंसह त्यांची दुसरी पत्नी भारती, भारतीचा भाऊ जगदीश भांडारकर व मुलगी छकुली यांनी बहीण जयश्रीला जाळून मारल्याचा आरोप सुजीत यांनी केला आहे. फॉरेन्सिक पथकाकडून शवविच्छेदन होऊन पोलिसांनी संपूर्ण तपास करावा, संबधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील सुजीत यांनी केली आहे.

वाचा: शेवगावचा एसटी डेपो मध्यरात्रीपासून अचानक बंद; आता झाले 'हे' निमित्त

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज