अ‍ॅपशहर

Jalna Raid : फेल जाणार होता आयटीचा प्लॅन; घर आणि कंपन्यांमध्ये काहीच मिळालं नाही, मात्र नंतर...

Jalna IT Raid News : जालन्यात १ ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जात आयटी विभागाने स्टील कारखानदारांवर आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2022, 11:38 am
जालना : जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठं घबाड हाती लागलं आहे. या छापेमारीत तब्बल ५८ कोटी रुपयांची रोख रक्कम, ३२ किलो सोनं, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज आणि सुमारे ३०० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा ऐवज जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalna it raid
जालना आयकर विभाग छापा


राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. यावेळी सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकारी आणि कर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते.

जालन्यात IT Raid कशी पडली, स्टील आणि भंगार व्यावसायिकांची चलाखी, GST खात्याने टीप दिली अन्....

घर आणि कार्यालयांमध्ये काहीच सापडलं नाही, मात्र फॉर्म हाऊसमध्ये आढळले घबाड

जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे जास्त उत्पन्न मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या नाशिक अन्वेषण व शोध (डिटेक्शन) विभागांतर्गत औरंगाबादच्या पथकाला मिळाली. यातून प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात १ ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदारांवर आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली. त्यात सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यानंतर या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला.

दरम्यान, फार्म हाऊसवर कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली आहे.

महत्वाचे लेख