अ‍ॅपशहर

गावी सोय नसल्याने मामाकडे राहून शिक्षण, स्वप्नांच्या वाटेवर जातानाच विद्यार्थिनीचा करुण अंत

Jalna Accident : दररोज प्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता विद्यार्थिनी शाळेत जात होती. याचवेळी रस्ता ओलांडत असताना आलेल्या भरधाव ट्रकने तिच्या सायकलला धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2023, 9:12 am
जालना : मूळ गावी शिक्षणाची सोय नसल्याने मामाच्या घरी राहून ती शिकत होती. नेहमी प्रमाणे सकाळी आपली लाडकी 'सखी' सायकलवर बसून विद्यार्थिनी शाळेत जायला निघाली. मात्र अर्ध्या रस्त्यातच काळाने तिच्यावर घाला घातला. भरधाव ट्रकखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात काल सकाळच्या सुमारास ही हृदयाला घरं पाडणारी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jalna Student Accident Death
जालन्यात विद्यार्थिनीचा अपघात मृत्यू


साक्षी रामचंद्र जाधव (मूळ गाव सौंदलगाव ह. मु. पिंपरखेड) असे मयत मुलीचे नाव आहे. ती वर्गाची मॉनिटर होती, शिक्षणात हुशार असल्याने शाळेतील शिक्षकांची अतिशय लाडकी होती. साक्षीची खासियत म्हणजे कष्टांची तयारी होती. तिच्या मूळ गावी शिक्षणाची सोय नव्हती, पण शिकून खूप मोठं व्हायची उमेद होती, म्हणून शिक्षणासाठी १५ वर्षीय साक्षी मामाकडे राहायची.

रोज सकाळी शाळेला जाण्यासाठी साक्षी सायकल घेऊन जायची. मंगळवारी सकाळी पण ती आपल्या नित्यक्रमाप्रमाणे शाळेत जायला निघाली होती. पण रस्ता ओलांडत असताना काळ भरधाव ट्रकच्या रूपाने आला आणि साक्षीला चिरडूनच थांबला. अंगावर शहारे आणणारी ही घटना जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंबड फाट्याजवळ काल सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

साक्षी हिचे आई- वडील सौंदलगाव येथे राहतात. शिक्षणात हुशार असल्याने, चुणचुणीत साक्षीला तिच्या आई वडिलांनी शिक्षणासाठी पिंपरखेड येथील तिच्या मामाच्या घरी ठेवले होते. चिंचखेड येथील मत्स्योदरी विद्यालयात नववीच्या वर्गात ती शिक्षण घेत होती. आपल्या हुशारीमुळे ती वर्गाची मॉनिटर झाली होती, शाळेतील शिक्षकांची लाडकी पण होती.

दररोज प्रमाणे सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ती शाळेत जात होती. याचवेळी रस्ता ओलांडत असताना आलेल्या भरधाव ट्रकने तिच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात साक्षीचा जागीच मृत्यू झाला.

२३ वर्षीय तरुणाला हाव सुटली, हातावर पोट असलेल्या महिलेचा खून, सात दिवसात गूढ उकललं
घटनेची माहिती मिळताच अंबडचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील रुग्णालयात पाठविला. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. पंचनामा करण्यात आला.

आधी पितृछत्र हरपलं, आता लेकही गेला, पोलीस भरती चाचणीनंतर विदर्भातील तरुणाचा मुंबईत मृत्यू
साक्षी जाधव हिच्या पार्थिवावर सौंदलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साक्षी मत्स्योदरी विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. हुशार असल्याने शिक्षक तिचे नेहमी कौतुक करीत होते. आता ही हुशार विद्यार्थिनी पुन्हा कधीच दिसणार नसल्याने शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थी शोकसागरात बुडून गेले होते.

महत्वाचे लेख