अ‍ॅपशहर

राजर्षी शाहू महाराजांवर आता हिंदीत कादंबरी

दीनदलितांच्या उद्धारासाठी आणि प्रजेच्या प्रगतीसाठी आयुष्यभर लढलेल्या राजर्षी शाहू महाराजांवर अनेक संशोधित ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, तुलनेने ललित साहित्यातून शाहूंचा जीवनपट कमी चितारला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2018, 10:03 pm
Balasaheb.Patil@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a hindi novel on rajarshree shahu
राजर्षी शाहू महाराजांवर आता हिंदीत कादंबरी

Tweet: balpatilMT

कोल्हापूर :

दीनदलितांच्या उद्धारासाठी आणि प्रजेच्या प्रगतीसाठी आयुष्यभर लढलेल्या राजर्षी शाहू महाराजांवर अनेक संशोधित ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, तुलनेने ललित साहित्यातून शाहूंचा जीवनपट कमी चितारला आहे. मराठी साहित्याचा अपवाद वगळता या महान राजाची उपेक्षाच झाली. आता मात्र, दिल्लीतील ख्यातनाम हिंदी लेखक संजीव यांनी हे शिवधनुष्य पेलत शाहूंच्या आयुष्यावर हिंदीत कादंबरी लिहिली आहे.


कानपूरच्या वाणी प्रकाशनतर्फे जुलैमध्ये कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. समाजोद्धारासाठी आयुष्यभर लढलेल्या शाहूंवरील कादंबरीचे ‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ हे नावही तितकेच समर्पक आहे.

राजर्षींच्या जीवनकार्यावर अनेक संशोधित ग्रंथ प्रकाशित झाले. मात्र, कथा, कादंबरी किंवा नाटक या रुपात राजर्षींचे कार्य खूप कमी लिहिले गेले. मराठीत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांची ‘शाहू’ ही एकमेव कादंबरी प्रकाशित आहे. माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी या कादंबरीचा नुकताच इंग्रजी अनुवाद केला आहे.

हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक संजीव यांच्या १० हून अधिक कादंबऱ्या, १५ हून अधिक कथासंग्रह प्रकाशित आहेत. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेध घेणारी त्यांची कादंबरी सध्या गाजत आहे. या कादंबरीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला. यादरम्यान ते कोल्हापूरला आले असता त्यांना शाहूंचे एक वाक्य वाचनात आले. ‘देशाचा विकास व्हायचा असेल तर जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे,’ या एका वाक्याने त्यांना शाहूंच्या कार्याकडे आकर्षित केले. हा माझ्या आत्म्याचा आवाज आहे, असेच त्यांना वाटले. त्यातूनच सखोल अभ्यासांती त्यांनी ही कादंबरी साकारली.


संजीव सांगतात, ‘राजर्षींनी राष्ट्रनिर्माणात मोठे योगदान दिले आहे. त्यांचे शत्रू अमूर्त स्वरुपात होते. ते म्हणजे जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, गरिबी आणि द्वेशभावना. या सगळ्यांशी लढता लढता एखादा माणूस कसा विजयी होऊ शकतो, याचे चित्रण माझ्यादृष्टीने महत्त्वाचे होते. राजर्षी तत्कालीन परिस्थितीशी, शत्रूंशी कसे लढले याचे चित्रण कादंबरीत आहे. या कादंबरीत जातीव्यवस्थेतील अंतर्विरोधाचे चित्रण करण्यासाठी पात्रांची पुनर्निर्मिती करावी लागली. शाहूंच्या मनात अनेक गोष्टी आल्याही नसतील पण, जातिअंतासाठी शाहूंनी जो लढा दिला, रयतेच्या प्रगतीसाठी त्यांनी जे विचार मांडले ते चित्रित करण्यासाठी मला ते करावे लागले'.

कादंबरी लेखन करताना संजीव यांनी अण्णासाहेब लठ्ठे, धनंजय कीर, रमेश जाधव, जयसिंगराव पवार, राजन गवस, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. गिरीश काशीद यांच्यासह अनेक संशोधकांशी चर्चा केली. कोल्हापुरातील अनेक स्थळे पाहिली. याबरोबरच जातीव्यवस्थेशी लढणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या समकालीन व्यक्तींचाही त्य़ांनी शोध घेतला. यासाठी गोंदिया, कानपूर, बडोद्यालाही ते गेले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज