अ‍ॅपशहर

‘माझी कन्या भाग्यश्री’ पोरकी

कोल्हापूर : ‘माझी कन्या भाग्यश्री’च्या सुधारित योजनेचा गाजावाचा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. या योजनेसाठी इच्छुकांनी प्रशासनाशी संपर्क साधला असता सरकारकडून निधीची तरतूद केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लेक वाचण्यासाठीची आखलेली ही योजना अंमलबजावणीपूर्वीच पोरकी झाली आहे.

Maharashtra Times 31 Jul 2017, 3:00 am
Bhimgonda.Desai@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhagyashree scheme of maharashtra government update in kolhapur
‘माझी कन्या भाग्यश्री’ पोरकी


Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : ‘माझी कन्या भाग्यश्री’च्या सुधारित योजनेचा गाजावाचा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. या योजनेसाठी इच्छुकांनी प्रशासनाशी संपर्क साधला असता सरकारकडून निधीची तरतूद केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लेक वाचण्यासाठीची आखलेली ही योजना अंमलबजावणीपूर्वीच पोरकी झाली आहे.

सरकारने प्रचार, व्यापक प्रसिद्धी केल्याने पालक अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा, तालुका पातळीवरील महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी जन्मल्यानंतर एका वर्षात अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी पालक हेलपाटे मारीत आहेत. सरकारी अनास्थेमुळे कार्यवाही सुरू होण्यापूर्वीच उदासीनतेमुळे योजनेचा बोजवारा उडाला आहे.

ही योजना याआधी केवळ दारिद्ररेषेखालील कुटुंबांसाठी होती. मुलींच्या जन्मदरात सुधारणा होण्यासाठी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली. १३ फेब्रुवारी, २०१४ च्या सरकारी आदेशाप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील दाम्पत्यास मुलगी झाल्यास तिच्या नावावर १८ वर्षानंतर एक लाख रुपये जमा करण्याची योजना आहे. त्यामध्ये सुधारणा करून दारिद्र्य रेषेवरील कुटुंबातही मुलीचा जन्म झाल्यास योजनेचा लाभ देण्याचा‌ निर्णय सहा महिन्यापूर्वी झाला. १ एप्रिल, २०१६ नंतर जन्मलेल्या दारिद्र्यरेषेवरील पात्र कुटुंबांतीलही मुलीच्या खात्यावर ही १८ वर्षानंतर १ लाख रूपये जमा करण्यात येणार आहेत.

नव्या आदेशानुसार आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरून दिल्यास त्या मुलीच्या नावे आयुर्विमा महामंडळ २१ हजार २०० रुपये भरेल. त्यासाठी पालकांना पैसे भरण्याची गरज नाही. परंतु, हे पैसे भरण्यासाठी महामंडळाला सरकारचे आदेश नाहीत. सरकारने महामंडळाकडे पैसे वर्ग केले नाही, असे सांगण्यात येते. यामुळे अर्ज घेणे नाकारले जात आहे. महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यास विचारणा केल्यानंतर सरकारकडून निधी आला नाही, अंमलबजावणीचे आदेश आले नाहीत, असे थेट न सांगता तुम्ही दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेतलेल्याचे प्रमाणपत्र आणा, अशी विविध कारणे सांगितली जात आहेत.

लेक वाचवण्यासाठी सरकार योजनेचा गाजावाजा केला. सोशल मीडियातून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मात्र सहा महिने झाले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. ‌अशीच परिस्थिती राहिल्यास मुलगी जन्मल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करण्याच्या अटीत अनेक इच्छुक पालक बसणार नाहीत.

सोन्याची नाणी पण…

योजनेतून पात्र कुटुंबास मुलगी जन्मोत्सवावा आनंद साजरा करण्यासाठी पाच हजार रुपये, तिच्या आजी, आजोबांना सोन्याची नाणी भेट देण्यासाठी पाच हजार, ती मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षी पोषणासाठी दोन हजार, शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक वर्षाला शिक्षणासाठी अडीच हजार मिळणार आहे. मुलीस सहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाला तीन हजार दिले जातील. परंतु, योजनेची अंमलबजावणीच नसल्याने पात्र कुटुंबास वंचित राहावे लागेल.

योजनेतून लाभ घेण्यासाठी दोन मुलींवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीचे सुधारित आदेश आले नाहीत. निधीची तरतूदही नाही. त्यामुळे अर्ज स्वीकारण्यास अडचणी येत आहेत.

एस. डी. मोहिते, प्रभारी महिला व बाल कल्याण अधिकारी



माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व बालकल्याण कार्यालयाकडे अनेककदा हेलपाटे मारले. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत. नविन आदेश आले नाहीत, सरकारने निधीची तरतूद केली नाही, असे अधिकारी सांगत आहेत. योजनेचा लाभ मिळालेला नाही.

प्रल्हाद बरगाले, इच्छुक पालक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज