अ‍ॅपशहर

स्वातंत्र्याच्या नावावर काहीही खपवू नका

कलाकार म्हणून मला जे वाटतं ते मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवंच, पण ऐतिहासिक कथा सिनेमातून मांडताना त्या स्वातंत्र्याच्या नावावर काहीही खपवणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही.

Maharashtra Times 25 Jan 2018, 7:40 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nana-patekar


कलाकार म्हणून मला जे वाटतं ते मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवंच, पण ऐतिहासिक कथा सिनेमातून मांडताना त्या स्वातंत्र्याच्या नावावर काहीही खपवणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. माझ्या सिनेमामुळे कुणीही दुखावणार नाही, हा सेन्सॉरबोर्ड आधी स्वत:चा असला पाहिजे, अशा परखड शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या वादग्रस्त 'पद्मावत' सिनेमाबाबत बोलताना टोला लगावला.

'पद्मावत' या सिनेमाच्या प्रदर्शनावरून सध्या वादंग सुरू आहे. याबाबत कलाकार म्हणून आपले काय मत आहे, या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित संवाद या कार्यक्रमात ही चर्चा झाली.

याविषयी बोलताना नाना म्हणाले, मी आजपर्यंत संवेदनशील विषयाचा गाभा असलेले किमान ५० सिनेमे केले. मात्र ते कधीच कोणत्या वादात अडकले नाहीत. इतरही अनेक सिनेमे पडद्यावर आले की, जे महापुरूष, ऐतिहासिक व्यक्तीरेखा यांच्याशी निगडीत होते, पण असे विषय निवडताना आणि मांडताना जे भान असायला हवे, ते जपलेच पाहिजे. सेन्सॉर या शब्दाचा अर्थ मर्यादा असा आहे. माझ्या कलाकृतीमुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, यासाठी त्यात मी काय आणि कसे मांडायचे याचे दुसरे टोक हातात असणारा धागा म्हणून सेन्सॉर या नियमाकडे पाहिले पाहिजे. सिनेमा हे माध्यम केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर ते परिवर्तनाचे, प्रबोधनाचे, एखाद्या गोष्टीकडे अंतर्मुख होऊन पाहण्याची सजग दृष्टी देणारे माध्यम आहे. त्याची हाताळणीही तितक्याच प्रगल्भपणे झाली पाहिजे. जेव्हा ऐतिहासिक वास्तववादी कथा सिनेमासाठी निवडल्या जातात तेव्हा ती कथा पुराणात ज्या प्रदेशात घडली आहे, त्यातील रूढी-परंपरा ज्या समाजात आजही पाळल्या जातात ते लोक अशा कथांशी थेट जोडले जात असतात. अशावेळी सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावावर जर आपण काहीही दाखवणार असू किंवा घडलेल्या प्रसंगाची मोडतोड करणार असू तर ते त्या समाजाच्या भावना दुखावणारं ठरू शकतं, हा विचार प्राधान्याने व्हायला हवा. शिवाय सेन्सार बोर्ड म्हणून सिनेमाला संमती देणारी माणसं अभ्यासू आणि त्या विषयातील सखोल परिणामांचा विचार करणारीही असणेही आवश्यक आहे.

यावेळी 'आपला माणूस,' सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री इरावती हर्षे, निखिल साने आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज