अ‍ॅपशहर

डंपरच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने मोटारसायकलला ठोकरल्याने बापलेकीचा मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यात चिंचवाड-उदगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Maharashtra Times 21 Feb 2017, 3:00 am
जयसिंगपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम father daughter death in accident
डंपरच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू


भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने मोटारसायकलला ठोकरल्याने बापलेकीचा मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यात चिंचवाड-उदगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिलिंद दशरथ व्हनखंडे (वय २८) आणि तृप्ती मिलिंद व्हनखंडे (वय ४, रा.उदगाव) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपर पेटविला तसेच अंकली पुलावर रास्ता रोको केला.

याबाबत पोलिसांतून तसेच घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मिलिंद व्हनखंडे हे मुलगी तृप्ती हिच्यासमवेत चिंचवाड येथे पाहुण्यांकडे गेले होते. सोमवारी सकाळी पल्सर मोटारसायकलवरून ते उदगावकडे येत होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने मोटारसायकलला धडक दिली. मिलिंद व तृप्ती हे डंपरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाले. अपघातानंतर डंपर अपघातस्थळी न थांबता अंकलीच्या दिशेने निघून गेला.

दरम्यान, अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी हृदय हेलावणारे चित्र पाहून संतप्त झालेल्या जमावाने डंपरचा शोध सुरू केला. अंकली येथे वीट भट्टीजवळ डंपर उभा करून चालकाने पलायन केले होते. या डंपरवर जमावाने दगडफेक केली, तसेच डंपर पेटवून दिला. डंपर चालकास तत्काळ अटक करावी या मागणीसाठी अंकली टोलनाक्याजवळ जमावाने रास्ता रोको केला. यामुळे कोल्हापूर सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. याठिकाणी दुसऱ्या डंपरवर जमावाने दगडफेक केली. अपघाताची वर्दी सलिम महमद पेंढारी यांनी दिली. यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला.

शोकाकुल वातावरणात मिलिंद व तृप्ती यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात आले. मिलिंद व्हनखंडे हा वाळू भरणीचे मजुरीचे काम करीत होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज