अ‍ॅपशहर

इचलकरंजीत फक्त नोटिशींवरच भागणार?

पावसाळ्यात जुन्या, जीर्ण व नादुरुस्त झालेल्या इमारती, घरांना धोका असल्याने नगरपालिकेने यंदा १७९ मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. यातील अवघ्या दहा ते बारा घरांची डागडुजी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे, उर्वरित धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एखादी गंभीर घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय, असाही प्रश्न यातून उपस्थित होतो.

Maharashtra Times 26 Jul 2017, 11:41 pm
इचलकरंजी : पावसाळ्यात जुन्या, जीर्ण व नादुरुस्त झालेल्या इमारती, घरांना धोका असल्याने नगरपालिकेने यंदा १७९ मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. यातील अवघ्या दहा ते बारा घरांची डागडुजी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे, उर्वरित धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एखादी गंभीर घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय, असाही प्रश्न यातून उपस्थित होतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ichalkaranji council issues notices
इचलकरंजीत फक्त नोटिशींवरच भागणार?

गत वर्षी गाव भागातील राम मंदिर परिसरातील जुने दगड मातीचे घर कोसळून तिघांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. जुन्या, जीर्ण व धोकादायक इमारतींची पाहणी करून दोनशेहून अधिक इमारती, घरे धोकादायक ठरविण्यात आली होती. त्यानुसार संबधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
शहरातील एखादी इमारत अगर तिचा काही भाग, छप्परकाम, जिना, इतर कामाचा भाग धोक्याचा असल्यास त्याची लेखी माहिती नगरपालिकेच्या बांधकाम विभागात द्यावी लागते. त्यानंतर प्रशासन संबंधितांना नोटीस पाठवते. मात्र धोकादायक घरांची, इमारतींची पाहणी करून धोका नाहीसा करण्याच्या दृष्टीने शक्य ती उपाययोजना नगरपालिकेकडून करण्यात येत नाहीत. केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडले जातात. धोकादायक इमारतीबाबतची माहीती व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात क्षेत्रीय अधिकारी नियुक्त आहेत. मात्र त्यांच्याकडून आजपर्यंत अशा प्रकारचे अहवाल आल्याची माहिती नाही.
इचलकरंजीत गावभाग, जुना चंदूर रोड, जवाहरनगर, गणेशनगर, या परिसरात अजूनही धोकादायक इमारती, घरे आहेत. मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने संबाधित धोकादायक इमारती, घरांच्या मालकांना नोटिसा लागू केल्या आहेत. यातील चांदणी चौक, नरसोबा कट्टा व मोठे तळे येथील जुन्या घरांच्या भिंती पावसाळा सुरू झाल्यानंतर पडल्या. तिन्ही ठिकाणी जीवितहानी झाली नसली तरी पालिका प्रशासनाने यातून कोणता बोध घेतला असाही प्रश्न पडतो.
धोकादायक चाळ
शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा चौकात एका माजी नगरसेवकाची स्थावर मालमत्ता आहे, यावर न्यायालयीन वाद असल्याने जागा मालकांचे नातेवाईक याकडे लक्ष देत नाहीत, काही दुकानदार तसेच इमारतीचे वापर करणाऱ्यांनी किरकोळ डागडुजी करून धोकादायक भाग हटविला आहे, तर काहींनी विनापरवाना इमारती, दुकाने बांधली आहेत. अजूनही काही घरे धोकादायक आहेत, याकडेही नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज