अ‍ॅपशहर

शहीद तुपारे यांना अखेरचा निरोप

जम्मू काश्मीर येथील लेह-लडाख परिसरात सेवा बजावत असताना दराज येथे बर्फवृष्टीमध्ये अडकून महिपाळगड (ता. चंदगड) येथील जवान महादेव पांडुरंग तुपारे (वय ३४) हे शहीद झाले. त्यांना रविवारी सकाळी दहा वाजता हजारोंच्या उपस्थितीत अंतिम निरोप देण्यात आला.

Maharashtra Times 14 Mar 2017, 3:00 am
चंदगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jawan tupare funerle
शहीद तुपारे यांना अखेरचा निरोप


जम्मू काश्मीर येथील लेह-लडाख परिसरात सेवा बजावत असताना दराज येथे बर्फवृष्टीमध्ये अडकून महिपाळगड (ता. चंदगड) येथील जवान महादेव पांडुरंग तुपारे (वय ३४) हे शहीद झाले. त्यांना रविवारी सकाळी दहा वाजता हजारोंच्या उपस्थितीत अंतिम निरोप देण्यात आला. गावातीलच शिवराज विद्यालयाच्या पटांगणावर साश्रुनयांनी तुपारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराच्या वतीने फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहीद महादेव याचा भाऊ पुंडलिक याने पार्थिवाला भडाग्नी दिला.

जवान महादेव तुपारे हे गुरुवारी (ता.८) लेह-लडाख परिसरातील दराज येथे सेवा बजावत असताना बर्फवृष्टीमध्ये अडकून शहीद झाले.या घटनेची माहीती गावात समजताच गावावर शोककळा पसरली. गुरुवारपासून ग्रामस्थ सर्व व्यवहार बंद ठेवून पार्थिवाच्या प्रतिक्षेत होते. रविवारी सकाळी पार्थिव येणार असल्याने ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी केली होती. रविवारी सकाळी बेळगाव येथे पार्थिव आल्यानंतर सेनादलाच्या वतीने मानवंदना देवून पार्थिव महिपाळगडावर आणण्यात आले. सकाळी साडेसात वाजता पार्थिव गावातील शिवाजी चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव तुपारे यांच्या घरी नेण्यात आले. तुपारे यांचे पार्थिव पाहून पत्नी रुपा व आईने फोडलेला हंबरडा ह्दय हेलावून टाकणारा होता. कुटुंबियांच्या आक्रोश पाहून ग्रामस्थही गहिवरले. तुपारेंना अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी ठिकठिकाणी कमानी उभ्या केल्या होत्या. गावात जागोजागी जवान तुपारे यांच्या श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आले होत. पार्थिवाचे अंत्यदर्शन झाल्यानंतर गावातील मुख्य मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी वीर जवान महादेव तुपारे अमर रहे, भारतमाता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अंत्ययात्रेमध्ये विद्यार्थी, ग्रामस्थ, भजनी मंडळे, लष्कराचे अधिकारी, सरकारी अधिकारी यांच्यासह तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजता पार्थिव स्मशानभूमीत पोहोचले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अमित सैनी, खासदार धनंजय महाडिक यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, आमदार संध्यादेवी कुपेकर, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, पोलिस निरीक्षक महादेव सकळे, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, गोकुळचे संचालक राजेश पाटील, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे, गोपाळ पाटील, केडीसीसीचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्यासह लष्कराचे अधिकारी व ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करुन अखेरचे दर्शन घेतले. अंत्यदर्शनासाठी शिवराज महाविद्यालयाचे पटांगण लोकांनी फुलून गेले होते.

यावेळी कोल्हापूर पोलिस दल व १०९ टीए बटालीयन व कुमाऊँ रेजीमेंटच्या जवानांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. लष्कराच्या १४ जवानांच्या तुकडीने व पोलिस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

...............

चौकट

राज्य सरकारकडून मदत

शहीद जवान महादेव तुपारे यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने आठ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज