अ‍ॅपशहर

अंबाबाई मंदिर: पुजारी-समिती वाद चिघळला

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बसवलेले कॅमेरे बंद केल्याने पुन्हा एकदा पुजारी आणि देवस्थान समिती आमने-सामने आले आहेत. समितीने पुजाऱ्यांच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला असून, कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे ठणकावले आहे.

Maharashtra Times 27 Oct 2017, 9:56 pm
मटा ऑनलाइन वृत्त। कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur ambabai temple priest and management committee issue
अंबाबाई मंदिर: पुजारी-समिती वाद चिघळला


करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बसवलेले कॅमेरे बंद केल्याने पुन्हा एकदा पुजारी आणि देवस्थान समिती आमने-सामने आले आहेत. समितीने पुजाऱ्यांच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला असून, कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे ठणकावले आहे. समिती आणि पुजाऱ्यांच्या बैठकीत जोरदार वाद निर्माण झाल्याचे समजताच पुजारी हटाव संघर्ष समितीने धाव घेऊन गाभाऱ्यावर मालकी हक्क गाजवू पाहणाऱ्या पुजाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी पुजाऱ्यांना बंदोबस्तात बैठकीतून बाहेर काढले.

अंबाबाई देवीच्या लाईव्ह दर्शनसाठी देवस्थान समितीने गुरुवारी दुपारी मंदिराच्या गाभाऱ्यात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. यानंतर संध्याकाळी काही पुजाऱ्यांनी कॅमेरे बंद केले. शुक्रवारी सकाळी कॅमेरे कापडात बांधून ठेवले होते. याबाबत समितीने तातडीने पुजाऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवून समितीच्या कार्यालयात बैठक बोलवली होती. आज (शुक्रवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास बैठक सुरू झाली. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गाभाऱ्यातील कॅमेरे बंद केल्याबद्दल पुजाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पुजाऱ्यांनी समितीला निवेदन दिले. ‘गाभाऱ्याची किल्ली पुजाऱ्यांकडे असते. मंदिरातील गाभाऱ्याचा कायदेशीर ताबा पुजाऱ्यांकडे आहे. समितीने बळजबरीने कॅमेरे बसवून पुजाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणली आहे. कॅमेरे त्वरीत काढून घ्यावेत, अन्यथा समितीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल,’ असा इशारा पुजाऱ्यांनी निवेदनाद्वारे समितीलाच दिला. यामुळे समितीचे पदाधिकारी खवळले.

अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, पुजाऱ्यांना केवळ पुजेचा अधिकार आहे. गाभाऱ्याला कुलूप लावण्याची भाषा करणाऱ्या पुजाऱ्यांसाठी आमच्याकडे मंदिराच्या सर्वच दरवाजांच्या चाव्या आहेत. कॅमेऱ्यांना विरोध करण्याचा अधिकार पुजाऱ्यांना नाही. गाभाऱ्यातील कॅमेरे सुरू राहणारच. कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याबद्दल संबंधित पुजाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार. कुणाचा आक्षेप असेल तर त्याने कोर्टात जावे. पुजाऱ्यांनी मुद्दाम कुरापत काढून वाद वाढवला असल्याने यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पुजारीच जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज