अ‍ॅपशहर

प्रलंबित गुन्ह्यांचा शोध लावा

जिल्ह्यातील सहा गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

Maharashtra Times 10 Mar 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur crime review by sp tambade
प्रलंबित गुन्ह्यांचा शोध लावा


जिल्ह्यातील सहा गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली कराव्यात. संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव अपेक्षित प्रमाणात आलेले नाहीत. त्यामुळे संशयितांवर कारवाईत चालढकल का होतेय? असा संतप्त सवाल पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना विचारला. गुरूवारी (ता. ९) पोलिस अधीक्षक कार्यालयातील क्राईम आढावा बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव, शिरोली, रुकडी आणि गिरोली घाटात झालेल्या खुनांचा उलगडा अद्याप झलेला नाही. याबाबत अधीक्षक तांबडे यांनी आढावा बैठकीत झाडाझडती घेतली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडून जिल्हा प्रशासनाची तपासणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अधीक्षक तांबडे म्हणाले, ‘वाढते गुन्हे रोखण्यासह आधी घडलेल्या गुन्ह्यांची उकल होणेही महत्त्वाचे आहे. रुकडी आणि शिरोली एमआयडीसीतील खुनांचा तपास लागलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांसह गुन्हे अन्वेषण शाखेनेही प्रयत्न करावेत.’

अधीक्षक तांबडे यांनी पोलिस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकांचाही आढावा घेतला. यापूर्वी तांबडे यांनी मटका, जुगार, चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्तावाच्या सूचना पोलिस निरीक्षकांना दिल्या होत्या. राजारामपुरी आणि गांधीनगरचा अपवाद वगळता उर्वरित पोलिस ठाण्यांतून प्रतिबंधात्मक कारवायांचे प्रस्ताव आले नाहीत. याबाबत तांबडे यांनी विचारणा केली. प्रतंबिधात्मक कारवाईसाठी अद्ययावत आणि बिनचूक प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी, उपअधीक्षक सतीश माने, भरतकुमार राणे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, प्रवीण चौगुले, अमृत देशमुख, अनिल देशमुख उपस्थित होते.

राजारामपुरी पोलिसांचे कौतुक

गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी राजारामपुरी पोलिस ठाण्यातून प्रतिबंधात्मक कारवायांचे तीन प्रस्ताव आले. अधीक्षक तांबडे यांनी तिन्ही प्रस्ताव मंजूर केल्याने १५ संशयित हद्दपार झाले. याशिवाय प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्या प्रकरणात कौशल्याने तपास करून तातडीने आरोपींना अटक केल्याबद्दल तांबडे यांनी राजारामपुरी पोलिसांचे कौतुक केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज