अ‍ॅपशहर

संगनमताच्या साखळीत राज्य बँकही

कोल्हापूर ः बंद पडलेला साखर कारखाना विकणारे आणि विकत घेणारेही एकच असल्याने शंभर दोनशे कोटींचा कारखाना केवळ वीस ते चाळीस कोटीला पदरात पाडून घेण्यात आला.

Maharashtra Times 19 Feb 2017, 3:00 am
Gurubal.Mali @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur irrregularities in suger factory land acquisition
संगनमताच्या साखळीत राज्य बँकही


Tweet: @gurubalmaliMT

कोल्हापूर ः बंद पडलेला साखर कारखाना विकणारे आणि विकत घेणारेही एकच असल्याने शंभर दोनशे कोटींचा कारखाना केवळ वीस ते चाळीस कोटीला पदरात पाडून घेण्यात आला. कारखान्याची किंमत ठरवणारेही तेच असल्याने साखळी करूनच शेतकऱ्यांचा साखर कारखाना मोडून खाल्ला. राज्य सहकारी बँकेच्या अधिकारी आणि तत्कालीन संचालकांमुळेच हे घडल्याचा आरोप केला जात आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाणाऱ्यांत सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्हीकडचे नेते असल्याने कारवाईबाबत ​प्रश्नचिन्हच उपस्थित केले जात आहेत.

राज्यातील ४२ सहकारी साखर कारखाने बंद पाडून संगनमताने विकल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला होता. या संचालकांविरूध्द त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण, प्रथम पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना न्यायालयाने केली. त्यानुसार स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील ८९ व्यक्तींविरोधात पुण्यातील ​शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २२ ऑक्टोबर २०१६ रोजी फिर्याद दाखल केली आहे. यात राज्यातील अनेक बडया उद्योगपतींचा तसेच आजी व माजी मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या दोन मुलांची तसेच वजनदार माजी मंत्र्यांची मुले व नातेवाईकांची नावे यामध्ये असल्याने साहजिकच चौकशीला ब्रेक लागला आहे.

जे कारखाने विकले, त्या कारखान्याच्या जमिनीवरच सर्वांचा डोळा होता. शेकडो एकर जमीन मिळवण्यासाठीच अनेकांनी कारखाना घेण्यात रस दाखवला. महाराष्ट्र राज्य बँकेची देणी भागवण्यासाठी हे कारखाने विकण्यात आले. यामुळे या कारखान्याची किंमत करण्यात हीच बँक आघाडीवर होती. या बँकेवर तेव्हा दोन्ही काँग्रेसचीच सत्ता होती. त्यामुळे किंमत ठरवणारे, विकणारे आणि विकत घेणारे असे सगळेच एक होते. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. शंभर कोटीचा कारखाना काहींनीकेवळ पंधरा कोटीत पदरात पाडून घेतला. शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीत कारखान्याची मूळ किंमत आणि झालेला घोटाळा याची आकडेवारीच सादर केली आहे. ते पाहता प्रत्येक कारखान्याच्या खरेदी-विक्रीत सत्तर ते शंभर कोटींचा मलिदा लाटल्याची चर्चा आहे. या जमिनी विकताना शर्थभंग करत राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवला आहे. नजराणा न भरताच या जमिनी खरेदी केल्या आहेत. हा नजराणा आता वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

तासगावचा कारखाना वाचला

तासगाव येथील साखर कारखानाही बंद पाडून विकण्याचा घाट घातला होता. त्यामध्ये काही राजकीय नेत्यांनी रस दाखवला होता. केवळ १६ कोटीत हा कारखाना विकत घेण्याचा डाव ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांनी उधळून लावला. तेव्हा कारखान्याच्या दारात आंदोलनही झाले. पण, इतर कारखान्यांत खमका नेता न मिळाल्याने ते खासगी होण्यात काहीच अडचणी आल्या नाहीत.
==

ज्या काळात कारखान्यासासाठी जमिनी विकत घेतल्या तेव्हाचे दर अत्यंत कमी होते. कारखाना सुरू झाल्यानंतर या जमिनीला सोन्याचा दर आला. पण, आता जमिनी विकताना तोच दर लावून घोटाळे करण्यात आले. याच सगळ्याच पक्षांचे नेते सहभागी आहेत.

राजू शेट्टी, खासदार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज