अ‍ॅपशहर

दोन गावांत निधींवर डल्ला

जयलयुक्त शिवार अ‌भियानातून जिल्ह्यातील ६९ गावांत बंधारे बांधणे, सलग समतल चर खोदणे, सिमेंट व मा‌ती नाला बांधणे अशी १२१२ कामे झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

Maharashtra Times 10 May 2017, 3:00 am
Bhimgonda.Desai
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur jalyukt shivar project
दोन गावांत निधींवर डल्ला

@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जयलयुक्त शिवार अ‌भियानातून जिल्ह्यातील ६९ गावांत बंधारे बांधणे, सलग समतल चर खोदणे, सिमेंट व मा‌ती नाला बांधणे अशी १२१२ कामे झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. यातील तमदलगे (ता. शिरोळ) आणि कुंभोज (ता. हातकणंगले) या गावातील कामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे चौकशीतून समोर आले. याबाबत तत्कालीन दोन वन अधिकाऱ्यांवर जबाबदारी न‌ि‌श्चित करण्यात आली. कामावर झालेला खर्च निधी वसूल का करू नये, अशा नोटिसा त्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यावरून या दोन गावांतील कामात निधींवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. अपवाद वगळता बहुतांश गावात अशीच कामे झाली आहेत. कामे कागदावर, पाणी गायब, निधी खर्च अशी स्थिती आहे.

तमदलगे, कुंभोज गावात सिमेंट क्राँक्रिट बंधारा, पाझर तलावातील गाळ काढणे, खोल सलग समतल चर खोदणे, माती नाला बांध टाकणे, अनघड दगडी बांध टाकणे, शेततळे खुदाई अशी कामे झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेले. प्रत्यक्षात ही कामे नियमाप्रमाणे झाली नसल्याच्या तक्रारी प्रचंड संख्येने झाल्या. त्याची दखल घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी स्थापन केली. समितीने चौकशी केली. यात तांत्रिक मान्यता न घेता काम करणे, भौगोलिकदृष्या चुकीच्या ठिकाणी काम करणे, नियम डावलून कामांचे ठिकाण बदलणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या. तत्कालीन वनअधिकारी रंगनाथ नाईकडे, ‌अनिल निंबाळकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. चौकशी अहवालातील ठपक्याने जलयुक्तमधील कामांतील पैशावर डल्ला मारण्यावर शिक्कामोर्तब केले.

सरकारच्या नऊ विभागांकडून निवडलेल्या गावांत‌ शेततळे, वृक्षारोपणासह तलावातील गाळ काढणे, ठिंबक सिंचन, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरूस्ती, गॅबियन बंधारे बांधणे, वनतळी खोदणे, लहान मातीचा बंधारा घालणे, झरा बळकटीकरण, वन्यप्राणी प्रतिबंधक चर खोदणे, विहीर पुनर्भरण, पाझर तलाव दुरूस्ती व गाळ काढणे, जुन्या जलस्त्रोतांची संवर्धन करणे, वळण बंधारा अशी तब्बल १२१२ कामे केल्याचे रेकॉर्ड प्रशासनाकडे आहे. प्रत्येक काम निधीप्रमाणे झाले आहे किंवा नाही, त्याची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी झाल्यास वस्तुस्थिती सामोरी येईल. दोन गावांतील कामांच्या चौकशीत ठपका ठेवलेल्यांचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अन्य गावांतील कामांचे मूल्यमापन होईल, अशी अपेक्षा ठेवणे धाडसाचे ठरेल. याउलट अनेक गावात कामे चांगली झाली असा दावा प्रशासनाचा आहे.

नऊ विभागांकडून कामे

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी, लघुसिंचन, पाटबंधारे, जलसंपदा, वन, सामाजिक वनीकरण, भूवैज्ञानिक विभाग, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा नऊ विभागांकडून ६९ गावांत कामे करण्यात आली. या विभागाची यंत्रणा पारदर्शक कामांऐवजी ढपलागिरीत आघाडीवर आहे असे गेल्या पाच वर्षांतील कामगिरीवरून दिसते. यंत्रणा तीच असल्याने ‘जलयुक्त’मध्येही डल्ला मारण्याची संधी घेतली गेली.

हिरवाई आहे कुठे?

जलयुक्त योजनेच्या प्रत्येक गावात जलसंधारणाची कमीत कमी ३० ते ३५ कामे झाल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कामे प्रत्यक्ष झाली असती तर गावे टंचाईमुक्त, हिरवीगार का झाली नाहीत, हा प्रश्न संबंधित गावांत उपस्थित होतोय. अनेक ठिकाणी लहान बांध, बंधारे वाहून गेलेत. कामे उरकली गेली अशीच स्थिती आहे.

जलयुक्त शिवार योजनेमधून गावांत भरीव कामे झाल्याचे दिसत नाहीत. काहीही फरक जाणवत नाहीत. दोन ठिकाणी बंधारे बांधले. तेथे पाणी साठून राहत नाही. त्यामुळे जलयुक्त योजनेमुळे काहीही फायदा झालेला नाही.

- सुमन साळोखे, सरपंच, बोळावी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज