अ‍ॅपशहर

पाणी हवे मुरायला

पाण्याचा सर्वांत मोठा स्रोत असलेल्या पावसाचे पाणी योग्यप्रकारे साठवले तर वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा घरच्याघरी तयार होऊ शकतो.

Maharashtra Times 16 Mar 2017, 3:00 am
Anuradha.kadam@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhaur doestic water need of rain water harvesting
पाणी हवे मुरायला


Tweet:@anuradhakadamMT

पाण्याचा सर्वांत मोठा स्रोत असलेल्या पावसाचे पाणी योग्यप्रकारे साठवले तर वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा घरच्याघरी तयार होऊ शकतो. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी छतावरचे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया गरजेची आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमांसाठी प्रशासनपातळीवर प्रबोधनाचा जागर उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच झाला तर पावसाळ्याच्या चार महिन्यात पाऊस ‘वाहून’ जाणार नाही. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन अशा पाऊसपाणी बचतीच्या संकल्पना यंदाच्या पावसाळ्यात फळाफुलाला आणण्यासाठी संयोजनाचे बिगुल वाजवण्याच्या तयारीत आहे.

शहराच्या मुख्य वसाहतीत असलेल्या गल्लीबोळांतील घरांच्या परिसरात पाऊसपाणी बचतीची संकल्पना कार्यान्वित होणे सध्या शक्य नसले तरी हा प्रयोग उपनगरातील घरांच्या आवारात होऊ शकतो. छतावरचे पावसाचे पाणी साठवण्यासाठी असलेल्या विविध पद्धती घरगुती पातळीवर वापरल्यास त्यातून वर्षभराची पाण्याची साठवणूक केल्यास सार्वजनिक जलसाठ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत मिळेल.

नव्या घरबांधणीत हार्वेस्टिंगचा नियम

नव्या घरबांधणीला परवानगी देताना छतावरील पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याची यंत्रणा असावी, असा राज्य सरकारचा नियम आहे. महापालिकेच्यावतीने हा नियम बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाच्यावेळी बंधनकारक केला आहे. उपनगरातील अनेक घरांसाठी या नियमानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा केल्याचे दाखवण्यात येते. काही प्रमाणात पर्यावरणाच्यादृष्टीने सजग असलेल्या नागरिकांकडून हा प्रयोग राबवला जातो. मात्र घर बांधून झाले आणि महापालिका प्रशासनाकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी क्लीनचीट मिळाली की काही दिवसांनंतर घराच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक घालून छतावरील पावसाचे पाणी साठवण्याऐवजी ते वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला जातो.

४७ गावे टँकरग्रस्त

पाण्याची श्रीमंती कधीही आटणार नाही अशा पाणीयोजनांनी तुडुंब भरलेल्या कोल्हापुरातील ४७ गावे गेल्या वर्षी टँकरग्रस्त होती. या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर शहरातील पाचगाव, जरगनगर, फुलेवाडी, सानेगुरूजी वसाहत यांसारख्या उपनगरांपासून ते शहराच्या मध्यवसाहतीतही टँकर मागवण्यात आले होते. मुळात टँकरने पाण्याचा पुरवठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी करावा, असा नियम आहे. मात्र टंचाईच्या झळांमुळे खर्चासाठी लागणारे पाणीही टँकरने पुरवण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे गावे आणि शहरातील उपनगरांचा बहुतांशी भाग टँकरमुक्त होण्यासाठी मदत मिळणार आहे.

पाण्याचे पुनर्भरण थांबले

पावसाचे पाणी जसे साठवण्याची गरज आहे तसेच छतावरील वाहून जाणारे पाणी थेट गटारी आणि नाल्यांमध्ये न मिसळता ते जमिनीत मुरण्याचीही गरज आहे. घरगुती स्तरावर हा प्रयोग होण्यात आवारात घातल्या जाणाऱ्या पेव्हिंग ब्लॉकचा अडसर येतो. तर शहरातील रस्त्यांवरही अनेकठिकाणी ​सिमेंटचे काँक्रिटीकरण व काही प्रभागातील छोट्या गल्ल्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक घातल्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया जवळपास बंद झाली आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण थांबले आहे. शहरातील आठशे बोअरना पाण्याचा पुरवठा करणारी जमिनीअंतर्गत असलेली प्रक्रिया थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे.



रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि भूगर्भात पाणी मुरवणे या गोष्टी घरगुती व सार्वजनिक पातळीवर होण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाच्या बांधकाम, नगरविकास आणि उद्यान विभागाच्यावतीने प्रबोधन केले जाते. यावर्षीही मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

नेत्रदीप सरनोबत, शहरविकास अभियंता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज